तुळजाभवानीचे दर्शन

तुळजापूरची तुळजाभवानी ही आम्हा देशपांडे कुटुंबियांची कूलस्वामिनी आहे. त्यामुळे मी सपत्निक व मुलगा, सून असे शनिवारी ( Corporate जगताला) सुट्टी म्हणून पुण्याहून तिच्या दर्शनासाठी गेलो. नवीन लग्न झालेले जोडपे व नवीन गाडी दोन्ही तिच्या पायाशी घालून आलो. 
तसा दिवसात ६०० किलोमीटर प्रवास व देवीच्या दर्शनासाठी ४, ४/३० तासाचा रांगेतील प्रवास हा भरपूर थकवणारा होता. पण ४/५ सेकंदांच आईचं सुंदर दर्शन झालं. काळ्या रुपातील तेजस्वी डोळ्याची आईची मुर्ती देखणी आहेच पण कणखरही. हजारो लेकर रांगेत होती. यातील कुणीही Black life matters? च्या आंदोलनात नसत कारण या सगळ्यांची आईच काळी. पण या आईच्या रंगाची ओळख नसलेल्या पेज थ्री जनतेच्या इंग्रजी आंदोलनात समाजाचा सहभाग का मिळत नाही हे ही मला समजले.
या रांगेत ४/५ तास वेळच वेळ होता. तेंव्हा आईच्या आईपणाची परत ओळख झाली. या आईने आईपणाची किती झिज सोसली ते आठवले. एका गाण्याच्या चार ओळी आठवल्या.
तुळजापूरची भवानी, माय मह्नमंगला,
राऊळात अधम खान, दैत्यासह पोहोचला,
मुर्ती भंगली, मनात चित्रगुप्त हासला,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला.
आम्हा सर्वांचे दैवत असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे दैवत असलेली आई भवानीने शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी स्वतः घणाचे घाव सोसले व छत्रपती शिवाजी महाराजांनी या आपल्या आईच्या अपमानाचा यथोचित बदला घेतला. बत्तीस दातांच्या बोकडाचा नैवेद्य त्या मुलाने आईला दाखवला. अफझलखान क्रौर्यकथेतील नायिकेच्या दर्शनासाठी मला येता आले होते.
त्या आईच्या दर्शनासाठी जमलेला तो सगळा भक्त गण न कळत माझ्या शिक्षणाचे काम करत होता. हजारोंच्या संख्येत होता पण माझाच देव खरा, तुझा खोटा अस म्हणत नव्हता. मला दे म्हणत होता पण तुझी पूजा करत नाही, तुला आई म्हणत नाही त्याला देऊ नको असे म्हणत नव्हता. तुझी कृपा सर्वांवर राहु दे असच मागण तो अडाणी भक्त मागत होता. तो म्हणत होता. 'सर्व मंगल मांगल्ये.'.
माझा एक आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे की हिंदू चिंतन हे वैश्विक चिंतन आहे. ते अद्वैत आहे. ते 'ते' म्हणून कुणाला दूर सारत नाही. याचा अनुभवही मला या दर्शनबारीमध्ये आला. मंदिर भवानी आईच. पण भक्तांना हेच शिकवलेले आहे की सर्व नमस्कार त्या देवाकडे पोहचतात. म्हणूनच या रांगेतील भक्त जोरजोरात विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा हे भजन आळवून आळवून म्हणत होते. देऊळ भवानी आईच म्हणजे शंकराची बायको पण हर हरींना फरकच पडत नाही. देवांना नाही ना भक्तांना. 
यात अजून एक घोषणा होती. जय भवानी जय शिवाजी व भारत माता की जय, तसेच वंदे मातरम् सुध्दा. भारताची राष्ट्रीय ओळखही धर्म हीच आहे.


म्हणूनच हिंदू म्हणजे काय? हिंदू धर्म, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू संस्कृती, हिंदू संस्कार, हिंदू नर नारी, व भारत देश. हे सर्व एकत्र म्हणजे हिंदू शब्द. कारण सर्व समावेशकता व त्यासाठी सर्वांप्रति आदर हा अशा प्रत्येक ठिकाणी पहाता येतो.
विविधतेसाठी, विविधतेविषयी आदर पाहिजे हे हिंदू धर्म (सनातन) वेदांपासून सांगतो, धर्म तत्वज्ञान गीतेतून सांगतो, संस्कृती वैश्विक प्रभावातून सुचवते, संस्कार कुटुंब रचनेतुन हिंदू नर नारी आत्मसात करतात व भारतीय विविधता ही या सर्वांसाठी जमिनी वास्तविकता शिकवते. त्या भजनांमधून त्या जनसामान्यांनी एवढ काही शिकवले. माझे कष्टच विसरले.
त्यावेळी या भवानीनेच छत्रपति शिवाजी महाराजांना युद्धासाठी तलवारही दिली मग शांतता, सर्व समावेशकतेचे काय हा प्रश्न ही पडला?हे कसे?

याचेही उत्तर मिळाले. जय भवानी जय शिवाजी या घोषणेत. सर्व समावेशकतेची पुर्व अट आहे न्याय करणे, अन्याय मोडून काढणे. गीतेत भगवंतांनी हेच सांगितले, तुळजाभवानी आईने तलवार देऊन हेच सांगितले व ज्ञानेश्वर माऊलींनी जे खळांची व्यंकटी सांडो म्हणून हेच सांगितले व या आधारावर हिंदू धर्माने वैश्विक सहजीवनाची सनद दिली, हिंदू तत्वज्ञान, संस्कृती, संस्कार यांनी रचना सांगितली, हिंदू नरनारींनी व्यवहार करुन दाखवला व भारत मातेने या प्रयोगासाठी भूमिदान केली व हे हिंदू जगाला अवघड परिस्थितीत अता आगामी काळात मार्गदर्शन करणार आहे.
हे सगळ त्या भवानी आईने त्या दर्शनबारीतून शिकवले. माझा वेळ, माझे श्रम वाया नाही गेले तर शिकवून गेले.
माझे तुळजाभवानी दर्शन असे झाले.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट