कार्यपध्दतीचे यश रा स्व संघ

लेखांक २८* 


*संघ यशाची कारणमिमांसा* 
 

संघ यशाची कारणमिमांसा करताना आपण पाहिले की संघटनेसाठी संघटना या मूळ हेतू पासून फारकत न घेता, फक्त पोपटाचा डोळा अर्जुनाला दिसत होता तसेच वर्तन ठेवल्यामुळे समाज स्वत: कृतिशील होऊन सर्व अपेक्षित कामे पूर्ण करेल ही डॉ हेडगेवार यांनी अपेक्षा पूर्ण झाली व संघटित कृतिशील समाजाने स्वयं प्रेरणेने समाज उत्थानाच्या व राष्ट्र उभारणीच्या कार्याला खांद्यावर घेतले.

पण समाज संघटित केला पाहिजे असे वाटणारे डॉ हेडगेवार एकटेच नव्हते, पण त्यासाठी कार्यपध्दती विकसित करणारे ते एकटेच, म्हणून वैशिष्ट्यपूर्ण होते. ह्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दतीला समजल्या शिवाय समाज संघटित कसा केला गेला हे समजणार नाही व त्या शिवाय संघ यशाचे गमक कळणार नाही.

संघ कार्यपध्दतीची काही वैशिष्ट्ये अन्यत्र आपण समजून घेऊ शकतो पण काही सूक्ष्म पण परीणामकारक वैशिष्ट्ये येथे पाहू.

संघ संस्थापकांनीच संघाच्या तात्पुरत्या स्वरूपाचे बीजारोपण करून ठेवले होते. आम्हाला संघाची सिल्व्हर, गोल्डन ज्युबिली साजरी करायची नाही हे त्यांनीच म्हटले होते. आम्हाला हे काम याची देही याची डोळा पूर्ण करायचे आहे, हे ही त्यांनीच म्हटले आहे. व डॉ हेडगेवार यांच्या शेवटच्या आजारपणात, गुंगीत, अजून काम पूर्ण होत नाही याचीच जाणीव व तगमग व्यक्त होत होती.

पण यात वैशिष्ट्य काय ? सामान्यपणे संस्था अमरपट्टा घेऊन आल्यासारखी चालवली जाते व त्यामुळे संस्था हेतू प्रधान न राहता संस्थाभीनिवेष हाच मुख्य उद्देश बनून जातो.

संघ हे सहजपणे टाळू शकला. अभिनीवेष न आल्याने संस्था कि राष्ट्रहित हा प्रश्र्न आल्यावर राष्ट्रहीत महत्त्वाचं ठरल. गांधी हत्या प्रकरण झाले त्यावेळी सर्व खोटनाट चालू होते, समाजाच्या भावना भडकवल्या जात होत्या. संघ ताकदवान होता.( ते पुढे संघ बंदी विरोधी आंदोलनात दिसले) पण श्री गुरुजींनी स्वयंसेवकांना एकच सांगितले Be calm at all cost. संघाचे नुकसान पण समाजात संघर्ष, दुफळी नाही होऊ दिली. व असेच मग अनेक प्रसंग. कधी पुर्वांचल, कधी बांगलादेश मुक्तीयुध्द, कधी हिंदू हिताला मत, यात तात्कालिक संस्था नुकसान झाले पण राष्ट्रहीत सर्वोच्च हे सत्य खणखणीत नाण्यासारखे वाजवले गेले.

संघ संस्थेचा स्वाभाविक समाज विलय कसा होईल हे माहिती नसेल पण संघ ही संस्था अजरामर करायची नाही हे संघ जन्मताच ठरल्याने संघहिताने कधीच छोटा स्वार्थ पाहिला नाही. राष्ट्र हिताच्या परिप्रेक्षातच संघ हित राहिले.

म्हणून हे संघ कार्यपध्दती मधील वैशिष्ट्यपूर्ण कलम ठरते. खूप बारकावा आहे पण म्हणून कार्यपध्दती यशस्वी आहे व हीच संघ यशाची कारणमिमांसा आहे.

अशीच अजून काही वैशिष्ट्ये पुढे पाहू.

सुनील देशपांडे.

Article (29/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन