संघ वैशिष्ट्य व्यक्ती निर्माण
लेखांक २९*
*संघ यशाची कारणमिमांसा**
संस्थेसाठी सर्वस्व झोकून द्यायचे पण अभिनिवेश येऊ द्यायचा नाही ह्यासाठी कसा प्रयत्न झाला व यश आले हे आपण पाहिले.
तसेच संघाचे सर्वात महत्त्वाचे काम हे व्यक्ती निर्माण. संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दती मधील सर्वात महत्वाची कडी. संघ यशाचे सर्वात महत्वाचे कारण.
पण व्यक्ती निर्माण कसे होते? त्यासाठी काय प्रक्रिया चालते? किती कालावधी लागतो? ह्याची कोणतीच रचना सामान्यतः कोणत्याच संस्थेत त्या काळी नव्हती व प्रायत: अद्यापही नाही. किंबहुना याची आवश्यकताच कोणाला जाणवत नाही. पण जर संघाचे यश समजवून घ्यायचे असेल तर कार्यकर्ता निर्माण, त्याची रचना, त्याचे महत्व हे समजावेच लागेल. व ध्येय यशासाठी ध्येयधुंद कार्यकर्ता ही पूर्व अट आहे.
संघात सहज वाटणारी व ज्या रचनेवर संघाच्या यशाचा डोलारा उभा आहे तो कार्यकर्ता घडतो संस्कारामधून. बाहेर संस्कार हा शब्द फार स्वस्त आहे. पाठांतर, शुध्द उच्चार, नमस्कार, गोड बोलणं म्हणजे संस्कार. पण प्रत्यक्षात संघात संस्काराची पूर्ण वेगळीच रचना आहे. ती म्हणजे कृतीशील संस्कार. म्हणून शाखा.
संस्कार म्हणजे व्यक्ति वर्तनाचा सकारात्मक परिणाम. कार्यमग्न कार्यकर्त्यांचे वर्तन हाच संस्कार व हेच संघ यशाचे गमक.
निस्वार्थ बुध्दीने समाजासाठी एक तास काढा म्हटल तर ते होणार नाही. पण मुख्यशिक्षक शाखे आधी तास व नंतर एक तास काढतो त्यावेळी स्वयंसेवक एक तास काढतो. मुख्यशिक्षकाचे भाषण नाही तर कृती संस्कार करते. आजारी स्वयंसेवकाची सेवा मुख्यशिक्षक करतो तेंव्हा समाज संकट प्रसंगी हजारो स्वयंसेवक धावून जातात.
एखादा स्वयंसेवक नवीन आला तर अन्य एखादा कार्यक्रम कमी करून परीचय करून घेतला जातो. कारण आत्मियतेसाठी परीचय आवश्यक असतो. कुटुंब भाव निर्माण होण्यासाठी परीचय आवश्यक असतो. हा कौटुंबिक भाव त्यागाची प्रेरणा देतो. जम्मू काश्मीर मधील हिंदू वरील संकटाची धग दक्षिणेच्या तामिळनाडू मधील स्वयंसेवकाला अस्वस्थ करते. कारण आता माझा देश बांधव हा परीचय झाला आहे.
संघाच्या सेवा कार्याची यादी, देशभरात कुठेही जाऊन काम करण्याची प्रेरणा, मृत्यू स्विकारण्याची तयारी, राष्ट्रीय प्रश्नाप्रति संवेदनशीलता याला कार्यकर्ता निर्माण असे म्हणतात व त्यासाठी सातत्यपूर्ण संस्काराची आवश्यकता असते. व हे संस्कार म्हणजे माझे वर्तन, जे पाहून दुसरा ते अंगिकारतो. संघात सतत हजारो कार्यकर्त्यांनी अशी वर्तन संस्काराची प्रक्रिया चालू ठेवली व कोट्यावधीच्या समाजाने ती स्विकारावी. व आपण पाहिले की समाजाने परीवर्तन करुन दाखवले.
कार्यपध्दती मधील कार्यकर्ता निर्माण व त्यासाठी कृति रूपी संस्कार या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दतीमुळे संघ यशस्वी ठरला.
अशीच यशाची अजूनही कारणमिमांसा करता येईल.
सुनील देशपांडे.
Article (30/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment