वैशिष्ट्य संघाचे संख्यात्मक वृत्त
लेखांक ३०
संघ यशाची कारणमिमांसा
संघाला ध्येय साकार करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दती उपयोगी पडली. त्या कार्यपध्दती मधील काही वैशिष्ट्ये आपण पहात आहोत.सामान्यपणे दृश्य स्वरूपात काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. जसे आर्थिक स्वावलंबन व त्यासाठी गुरू पूजनाचा कार्यक्रम, संघटन कामासाठी झोकून देऊन पूर्णवेळ काम करत असलेले प्रचारक, शाखा ही रोजची साधना व. पण त्या व्यतिरिक्त सुध्दा अशी वैशिष्ट्ये आहेत की ज्यामुळे ध्येयवाद वास्तवात उतरताना दिसत आहे.
यातील असेच एक वैशिष्ट्य आहे संख्यात्मक काम. सामान्यपणे कोणत्याही संस्थेत गुणात्मक काम हे चांगले मानले जाते न की संख्यात्मक. पण संघातील सर्व कारभार संख्येवर चालतो. शाखा भरताना संख्या, सोडताना संख्या. कारण या ध्येयवादाची पूर्व अट हीच आहे की संपूर्ण समाजाचे संघटन. त्यामुळे संख्या सर्वात महत्वाची. कार्यक्रमाला संख्या किती हे महत्वाचे. कारण लाखो कार्यकर्ते निर्माण करून कोटींच्या समाजाला गवसणी घालणे हेच संघाचे उद्दीष्ट आहे.
यातील एक माझ्या जीवनातील प्रसंग. अनंतराव देवकुळे हे संघाच्या अगदी सुरुवातीच्या फळीतील स्वयंसेवक. प्रत्यक्ष डॉ हेडगेवार यांच्या बरोबर काम केलेले कार्यकर्ते. त्यांनी मला विचारले कि नगरची लोकसंख्या किती? त्यावेळी एक लाख होती. मग एक हजाराचे संचलन निघाले पाहिजे. इति अनंतराव देवकुळे. त्यावेळी नगरचे संचलन १००/१५० संख्येचे होत असे.
त्यांच्या प्रश्नाने मला विचार करण्यास भाग पाडले. शिस्तबध्द, गुणवान शंभर तरूणांचे तालबद्ध संचलन महत्वाचे कि हजार तरूणांचे, थोडे ढिलेढाले असेल, पण *'हिंदुत्त्वाच्या अभिमानाने नवीन* **युग साकार करू'** असे स्वप्न पहाणारे संचलन अधिक महत्त्वाचे? संख्या सर्वेतोपरी.
हे वैशिष्ट्य आहे संघ कार्यपध्दती मधील. कारण स़ंघ मूळ उद्देश विसरला नाही कि संपूर्ण समाज हे ध्येय आहे. म्हणून संघात वृत्त हे संख्येचे असते. संख्या किती? सर्व समाज घटक आले का? प्रतिष्ठित आले का? पालावरची पण संख्या आली ना? हे वृत्त बनते.
प्रत्येकाला हेच माहिती असते की शाखा ही परीसरातील सर्वांसाठी लोहचुंबक असली पाहिजे. संख्यात्मक कार्यवाढ हे न लाजता सांगणारी कार्यपध्दती, हे या कार्यपध्दतीचे वैशिष्ट्य आहे.
अशीच अनेक आहेत.
सुनील देशपांडे
[Article 31/n]
Photo courtesy Google
Comments
Post a Comment