संघातील यादीचे गुपित

लेखांक ३४* 


*संघ यशाची कारणमिमांसा*


संघ म्हणजे शाखा. या शाखा चालवणे ही कार्यपद्धती मधील अनिवार्य बाब आहे. व या शाखा चालवण्यामध्ये ही कार्यपध्दती यशस्वी करणारे बारकावे आहेत.

आपल्याला समाज संघटित करावयाचा आहे. म्हणून हे माणसांचे काम आहे. व समाजाला आत्मिय भावनेने एकत्र करायचे आहे, म्हणून ही कुटुंब रचना पण आहे.

पण ही गोष्ट संघ शाखेत कुठे शिकली जाते. तर शब्द आहे यादी व गटपट. संघटित हिंदू समाजाचे सर्वात छोटे रूप म्हणजे शाखा. या शाखेवर परीसरातील प्रत्येकाला मैदानावर आणण्याचा प्रयत्न होतो. एकदाच आला तरी यादीत नाव जमा होते. हीच ती प्रसिद्ध यादी. ज्यात फक्त प्रवेश आहे. बाहेरची वाट नाही. यात निवड नाही. निकष नाहीत. अटी नाहीत. एकच मापदंड. ती व्यक्ती या शाखा परीसरात रहाते.

या यादीने पहिला संस्कार होतो कि निरपवादपणे संपूर्ण समाज संघटित करायचा आहे फक्त काही व्यक्ती संघटित करायच्या नाहीत. इथं गाळणी नाही फक्त जोडणी.

या जोडणीसाठी कोणत्याही कल्पकतेला बंधन नाही. जो सुचेल तो मार्ग, जी सापडेल ती वाट, पण शाखा परिसरातील प्रत्येकाला भेटायचे. ध्वजस्तंभ ठेवण्यासाठी जागा म्हणून एखाद्या घरावर स्वारी, तर उत्सवासाठी फुले हवीत म्हणून नव्या घरी शिरकाव. क्रिकेट संपल्यावर शाखा लावा, चालेल. गाण म्हणायला चल शाखेत, रात्रीची सिंहगड चढाई चल शाखेत. प्रवेश बंद ही पाटी नाही.

हीच ती यादी व अशी भरती. पण संस्कार महत्वाचा कि आम्हाला सर्वदूर पसरलेला वैविध्याने नटलेला हिंदू समाज निरपवाद पणे संघटित करायचा आहे. रंग, रूप, भाषा, सवयी सगळ्यात विविधता तरी सगळ्यांना एक करायचे व त्यासाठी भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जायचे व सगळ्या वेगळेपणानिशी या समाजाला एकत्र करायचे. हे काम शिकवतो हा बारकावा. यादी. शाखा परीसरातील सर्वांची यादी.

आज भारतभर जी विजयी संघटित समाज शक्ती अनुभवत आहोत ती या यादीरूपी छोट्याशा बलस्थानातून.

अशीच संघ यशाची कारणमिमांसा करू या पुढील भागात.

सुनील देशपांडे.

Article (35/n).

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन