स्वत्व जागृती साठीच हिंदू संघटन
लेखांक २४*
*संघ यशाची कारणमिमांसा*
हिंदू संघटन म्हणजे गलितगात्र हिंदू समाजात चैतन्य जागे करणे हे काम होते. पण मुद्दलात हिंदू हे अस्तित्वच नाकारलं जातं होत. किराणा दुकानात जसा किराणा नसतो तसेच हिंदू म्हणजे फक्त जातीची ओळख, बाकी हिंदू म्हणून काहीच नाही. या अपप्रचारा विरोधात सुरवात करून स्व चा विराट जागवायचा होता.
तर दुसरीकडे हिंदू हा शब्द फक्त समाजसुधारकांच्या आक्रमक हल्ल्याचा छातीवर वार स्वीकारण्यासाठीच वापरला जात होता.
हिंदू म्हणजे मागास, सतीची चाल, जातींची कडबोळी, अस्पृश्यता, विधवा केशवपन, बाल विवाह इ इ. हिंदू शब्द उच्चारला कि या किंवा अशाच कोणत्यातरी दोषाच्या चर्चेने त्याचा शेवट व्हावयाचा.
अशा दुहेरी कठीण संकटांचा सामना करत हिंदू संघटन करण्याची तारेवरची कसरत डॉ हेडगेवार यांना करायची होती.
एकाचवेळी आत्मसन्मान जागा करायचा होता, महान परंपरेच्या सार्थ अभिमानाने उत्तुंग ध्येयासाठी हिंदू समाजाला तयार करायचे होते त्याच वेळी पराभवासाठी आत्मपरीक्षण ही करायला लावायचे होते. ही ती तारेवरची कसरत होती.
आत्मपरीक्षण करण्यासाठी फार मोठ आत्मबल लागत असते. त्यामुळे हिंदू हा शब्द अत्यंत सन्मान्य असून जगातील सर्वात चैतन्यमय तत्त्वज्ञान आंगिकारलेल्या समाज समुहाचे ते अभिमानास्पद नाव आहे हा भाव जागर करून हिंदू समाजाला स्वाभिमानी बनवणे आवश्यक आहे हे ओळखून डॉ हेडगेवार यांनी समाज संघटन करण्यास प्रारंभ केला.
भारत भक्ती मधून स्वाभिमान जागृती व स्वाभिमान जागृत समाजाकडून आत्मपरीक्षण ही पध्दत डॉ हेडगेवार यांनी स्विकारली.
आधी समाज सुधारणा की आधी स्वाभिमान जागृती? जिवंत समाजाने स्वयं प्रेरणेने आत्मपरीक्षण करून समाज दोष दूर करायचे कि परकिय शासकाच्या मदतीने समाजाला हतोत्साही करत समाज सुधारणा करायच्या? या दुविधेवर प्रज्ञावंत डॉ हेडगेवार यांनी स्पष्ट केले ही स्वाभिमानी, ध्येयधुंद व कार्यप्रवण हिंदू समाजच आत्मपरीक्षण करू शकतो.
म्हणून हिंदू समाज संघटित करून, पारतंत्र्य झुगारून देणे हे राष्ट्रीय समाज म्हणून प्रथम कर्तव्य आहे व परीणामत: तंदुरुस्त शरीर जसे रोग सहज बरे करतात तसेच संघटित हिंदू स्वत: मधील दोष सहज दूर करतील, प्रयत्नपूर्वक दूर करतील.
ही योजना हे संघ यशाचे कारण आहे. कसे हे पुढील लेखात पाहू.
सुनील देशपांडे.
Article (25/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment