भव्य हिमालय.

सध्या उत्तराखंड मध्ये मजेत फिरायला आलो आहे. तसे हिमालयात येण्याची ही माझी पहिली वेळ नाही. अनेक वेळा हिमालयात फिरायला आलो आहे. हिमालयाची वेगवेगळी रूपे पाहिली आहेत, अनुभवली आहेत. तरीही हिमालयाचे माझे आकर्षण म्हणजे भव्य दिव्यता. प्रचंड उंची, नजर थिजवणारी खोली, एकिकडे प्रचंड वृक्षराजींचे जंगल तर दुसरीकडे बर्फाच्या पांढ-या रंगाशिवाय औषधाला दुसरा रंग नाही असे धवल रूप. डोळे विस्फारतील असे जलप्रपात आहेत. सर्व काही आहे ते भव्य दिव्य आहे. कमकुवतपणा, कोतेपणा, कद्रुपणाला कुठेही स्थान नाही.
आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचे आकर्षण वाटते व म्हणून मला हिमालयाच्या भव्यतेचे आकर्षण वाटते. त्या भव्यतेची प्रचंड किंमत तो हिमालय मोजत असतो. निसर्ग रग जिरवायला या भव्य हिमालयावरच आक्रमण करतो. कधी भूकंप, कधी अतिरेकी पाऊस, कधी हिम उत्पात, कधी आगांतुक हवामान बदल, पण हिमालय त्याचा आनंदाने स्विकार करतो.
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण हे हिमालयाने मनोमन स्विकारले आहे. 

एक सुखावणारं देखण पण भव्य रूप.
जोडीला मानवी वखवख व हाव याचे आक्रमण चालूच आहे. मुलींना खेळवावे इतक्या सहजपणे अंगाखांद्यावर नद्या खेळवत असलेल्या हिमालयावर मानवी आक्रमण करून आपण त्या नद्यांचे नाले करून टाकले आहेत. त्या मुलींचा सात्विक संताप तो बाप हिमालयच सोसत आहे. सज्जन योग्यांना आत्मिक शांती मिळावी म्हणून उंच शिखर आरक्षित ठेवलेल्या हिमालयातील ही पवित्र शिखरे आता Traffic Jam च्या समस्येने ग्रस्त आहेत. पण तरीही तो हिमालय त्याच भव्यपण या अन्यायाचे घाव सोसूनही तितक्याच अभिमानाने मिरवत आहे.
मला त्याचच आकर्षण आहे.
मला व्यक्तिगत आयुष्यात भव्यतेची भिती वाटते, आकर्षण वाटत असेल तरी. त्या भव्यतेची किंमत मोजायला मी तयार नाही.
म्हणून मला हिमालय कायम आकर्षित करतो. आज, अत्ताही करत आहे. फक्त त्याच्या भव्यतेमुळे. उद्या घरी परतेन पण परत यायचेच ह्या भव्यतेला भेटायला असा कृतनिश्चय करून.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन