संघ म्हणजे शाखा शाखा म्हणजे कार्यक्रम
लेखांत ३७*
*संघ यशाची कारणमिमांसा*
संघ कार्यपध्दतीमधील वैशिष्ट्यांमुळे संघ ध्येय गाठू शकला. त्या कार्यपध्दती मधील असाच एक मानाचा तुरा म्हणजे संघातील विविध प्रकारचे पण हेतूपूर्ण कार्यक्रम. यासाठीची संघातील शब्द रचना आहे, संघ म्हणजे शाखा व शाखा म्हणजे कार्यक्रम.
संघात लवचिक का असेना पण शाखेला चौकट आहे. एक तासाची नियमावली आहे. पण कार्यक्रम, उपक्रम यांना कोणतीही चौकट नव्हती. शाखा परीणामकारक चालण्यासाठी काहीही करा, कोणताही कार्यक्रम करा, पण शाखा, ही कार्यकर्ता निर्माण करणारी प्रभावी यंत्रणा बनली पाहिजे हे सुत्र व हेतू प्रत्येक कार्यक्रमाचा असला पाहिजे.
कार्यक्रमांची जंत्री देता येईल. निसर्गात सहल व तेथे संघर्षशाली मन तयार करणारे कार्यक्रम करणारी ही एक तस्वीर.
शाखा सोडून, इतर कार्यक्रमात सहली आल्या, पोहण्याचे वर्ग सुरू झाले, अभ्यासिका आल्या, वनभोजने आली, झुंझुरमास आले, रात्री १२ ला स्मशानात बैठक झाली, भेळभत्ता झाला, मॅरेथॉन झाले, यात्रा जत्रांमध्ये चपलांचे स्टॉल लागले, गीत गायनाच्या स्पर्धा सुरू झाल्या, दुरीतांचे तिमिर जाओ म्हणून सेवाकार्ये, सुरू झाली. फक्त एक अट देशभक्ती भाव जागरण हा हेतू विसरायचा नाही. या कार्यक्रमरूपी पोपटामध्ये होता शाखेच्या कार्यकर्ता निर्मितीचा प्राण.
फक्त एक उदाहरण पुरेसे आहे. आणिबाणी आली. पोलिस चौकी सुध्दा न पाहिलेल्या सामान्य लोकांनी अनिश्चित काळासाठी जेल पाहिला. कमावता माणूस तुरुंगात होता. घराची चिंता मन कुरतडत होती. समोरच्या अंधाराने अस्वस्थ झाला होता तो सामान्य स्वयंसेवक.
पण तसेच संघेतर इतरही अनेक जण आले होते, आपल्या ध्येयासाठी आयुष्य पणाला लावले होते, तेही निश्चितच ध्येयवादी होते पण रिकाम्या मनाने आले होते.त्यामुळे तिथे, त्या कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चिततेचा सैतान नाचत होता. बाहेरचा प्रतिष्ठित पुढारी अगतिक, लाचार झाला होता. रडत होता.
पण एक दोन दिवसात तुरूंगातील स्वयंसेवक सावरले. शाखा सुरू झाली. पण महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रम सुरू झाले. जे मला येते ते शिकवणार. योगासन वर्ग सुरू झाले, संस्कृत, होमिओपॅथी, ब्रीजचे डाव शिकवणे पण सुरू झाले, तीन अंकी नाटक बसली, गीत संध्येचा जन्म झाला. बासरी शिकवली गेली. सघोष संचलन झाले. जेल स्टाफला निष्णात डॉक्टर भेटले, स्वयंपाकघराचा ताबा बल्लभाचार्यांनी घेतला. २४ तास अपूरे पडू लागले.
एवढ्या संकटात एकही जण वेडा झाला नाही. संघेतरही सामील झाले.
ही ताकद आहे कार्यक्रमाची. संघ म्हणजे शाखा व शाखा म्हणजे कार्यक्रम या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे संघ ध्येय साकारू शकला.
कार्यक्रम नावाचा हा बारकावा संघ यशासाठी कळवून घ्यावाच लागतो.
असेच बारकावे पुढील भागात.
सुनील देशपांडे.
Article (38/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment