स्मरण महामना बाबासाहेब आंबेडकर यांचे

 लेखांक ५०* 

*स्मरण बाबासाहेबांचे*

अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात न भूतो एवढ्या विषयांना फक्त हात घातला नाही तर अभ्यासपूर्वक आपली भूमिका स्पष्ट केली. व नवीन दिशा दिली.
अशा महापुरूषाचे आज अनेक प्रकारे  स्मरण केले जाईल. व कितीही प्रकारे स्मरण केले तरी अजूनही काही तरी रहात आहे, असेच प्रत्येक स्मरणकर्त्यास वाटत राहील. 

असंख्य विलोभनीय पैलू असणारे संपन्न जीवन समोर आल्यावर, त्यातील मला भावलेला पैलु हेच खरे बाबासाहेब असेही स्मरणकर्त्यांना वाटू शकेल. पण त्या स्मरणकर्त्यांच्या मर्यादा असतील. त्या मर्यादेसह मी ही भारतरत्न बाबासाहेब यांचे स्मरण करणार आहे.

पूजनीय बाबासाहेबांचे सर्वात सोपं स्मरण म्हणजे घटनाकार. हे अत्यंत कष्टाचे, अनेकविध गुणवत्तांच्या व्यक्तिसमुहाला बरोबर घेऊन काम करायचे असल्याने अत्यंत जोखमीचे काम होते पण ते काम अनेक हातांनी चालू होते.

पण मला भावतात ते समाज धुरीण बाबासाहेब. त्यांना दलितोध्दारक म्हणता येईलच पण बाबासाहेब त्या पलिकडे होते. ते संपूर्ण देशाचा विचार करत होते म्हणून ते वेगळे होते. म्हणून ते स्वस्त आणि सोईचे काहीच करत नव्हते.

त्यांच महानपण शोधताना मला सर्वात भावतो तो पुणे करार. दीर्घदृष्टी असणारा समाज धुरीण कसा वागेल तसे बाबासाहेब वागले. वास्तविक उथळ समाज सुधारक असते तर संधीचे सोने केले असते. पण बाबासाहेब ओळखून होते की ज्या समाजात परीवर्तन करायचे आहे तो पूर्ण हिंदू समाज शत्रू बनवून घेतला तर माझं नेतृत्व सिद्ध होईल पण माझा समाज मात्र संतप्त शक्तिच्या ज्वालेत होरपळेल. माघार घेतली पण संपूर्ण हिंदू समाज कवेत घेऊन सुधारणांची पाऊल वाट अधिक जोमदार हमरस्त्यात बदलली.

म्हणून मला समाज धुरीण बाबासाहेब आंबेडकर अधिकच प्रिय वाटतात.

देश कि तत्कालिक लाभ हा प्रश्न आल्यावर क्षणिकही भ्रमित न होणारे बाबासाहेब मला पुणे करारात दिसले तसे फाळणी प्रसंगात ही दिसले. म्हणूनच सवंग हिंदू विरोधाचे राष्ट्र विघातक पाऊल त्यांनी उचलले नाही.

इंग्रजांची मदत घेईन, मुस्लिम, ख्रिश्चनांची मदत घेईन हे त्यांनी कधीच विचारातही घेतले नाही.

म्हणूनच बाबासाहेब हे Thoughts on Pakistan हे पुस्तक लिहू शकले. देशासमोर कोणता धोका आहे. इस्लाम कसा आहे. लोकसंख्या बदल का आवश्यक आहे. दलित बांधवांची अवस्था काय होईल? हे सर्व साक्षेपी पध्दतीने बाबासाहेबांनी समजावून सांगितले आहे. कुणाला?

त्याच हिंदू समाजाला ज्यांच्याशी बाबासाहेबांचा कडवा संघर्ष चालू होता. म्हणून त्यांना प्रचलित अर्थाने समाज सुधारक न म्हणता, समाज धुरीण म्हटल पाहिजे. कि ज्यांनी संपूर्ण समाजातंर्गत शोषितांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला.

समाज सुधारणा देशहिताच्या कुंपणा अंतर्गतच हा भाव कायम जागता ठेवून संपूर्ण समाज सुधारणा आंदोलनांना या महापुरूषाने संयमाची लक्ष्मणरेषा आखून दिली.


पण एवढे थोर व धिरोदात्त भारतरत्न डॉ आंबेडकर समजण्यात एक मोठा अडथळा आहे. व डॉ आंबेडकर यांच्यावर अन्याय सुध्दा आहे.
डॉ आंबेडकर यांचे साहित्य या ऐवजी डॉ आंबेडकर यांच्यावरील साहित्य हेच अधिक वापरले जाते व ते शस्त्रासारखे वापरले जात आहे. प्रत्यक्ष डॉ आंबेडकर यांचे साहित्य हे समाजासाठी सुईणी सारखे आहे पण ते बाजूला रहाते इतरांचे विषारी फुत्कार त्या महामानवाने काम अधिकच अवघड करतात.


Thoughts on Pakistan, असो, Emencipation of Untouchability, The Untouchable असो किंवा Budha & his Dhamma असो.  समाज वीण दुरूस्त करून माझ्या समाजाचे प्रश्न सुटतील हे भान त्यांचे कधीच सुटले नाही.

मार्टीन ल्युथर किंग ही असेच अमेरीकेतील आंबेडकर होते. नवनिर्माणाचे आग्रही.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही व्यापक
समाजहीत न सोडणारे समाज धुरीण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मला फार वंदनीय वाटतात.

यावर खूप विस्ताराने लिहिले पाहिजे. पण इंग्रजांच्या बहकाव्यात तामिळनाडूची जस्टिस पार्टी आली, अनेक जण आले. पण परतंत्र देशातील समाज चळवळी कशा चालवायच्या याचा आदर्श वस्तुपाठ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिला व म्हणून हे फक्त प्रतिकात्मक स्मरण. समाज वीण मजबूत कशी केली हे समजण्यासाठी.ती किती मजबूत केली कि हिंदू महासभेने राष्ट्र ध्वज समितीसमोर भगवा ध्वज राष्ट्रध्वज असावा ही मागणी आपण मांडा असा आग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे धरला व तो त्यांनी स्वीकारला.

स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांवर सर्वाधिक प्रभाव 
टाकणा-या प्रमुख नेत्यांमध्ये म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अढळपदी रहाते.


असेच काही महत्वाचे पुढील लेखात.


सुनील देशपांडे.
Article (51/n)
Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन