मृत्यूचे चिंतन

मृत्यूचे चिंतन.

मृत्यू खरच कसा आहे, काही समजत नाही. अचानक वा अनपेक्षित मृत्यूला आपण घाला म्हणतो. शेवटी मृत्यूनेच सोडवलं म्हणतो. मृत्यूने पकडले, गाठले म्हणतो तर मृत्यूला सामोरा गेला म्हणतो. मृत्यूचे तांडव म्हणतो तर मृत्यूने नीरव शांतता निर्माण केली म्हणतो.

मृत्यूला, भयकंपित करणारा काळराक्षस म्हणतो तर वेदनेतून मुक्ति देणारा देवदूत म्हणतो. मृत्यू एवढा क्रूर कसा? मृत्यू एवढा दयाळू आहे? ह्या दोन्ही भावना एकाच मृत्यू विषयी असतात.

सर्वात सत्य गोष्टीचा अस्पष्ट उच्चारही अभद्र समजतो. दिवसाच्या २४ तासात मृत्यूचा विचार करण्यास शूभवेळेचा क्षणही आमच्या कडे नाही. तरीही त्या मृत्यूला कर्दनकाळ पासून देवदूत ठरवत आहोत.

ज्या मृत्यूशी संबंध अपरिहार्य आहे तो टाळण्यासाठी किती आटापिटा करतो, किती त्याचा राग राग करतो, त्या मृत्यूच्या मनाचा काहीच शोध का नाही घेत?

सर्वात अपरिहार्य सहजीवन हे तर मृत्यू बरोबरच आहे ना? मग या मृत्यूचा प्रियकर का होता येत नाही. तो खरच कसा आहे? 

रागीट आहे, सरळ आहे, विकृत आहे, की जबाबदार आहे? का आणखी काही आहे. एक नक्की वाटत कि कर्तव्य कठोर आहे. त्याच सहचर्य निर्विवाद आहे. प्रत्येकाला आहे.

त्याच स्वागत करा कि निषेध? त्याच्या सहचर्याचा अभिमान बाळगा वा लाज? त्याला मानाने मिरवा वा त्यांच्यासाठी लज्जित व्हा पण त्याचे सहचर्य अपरिहार्य आहे हे समजून घ्या.

धर्माने हा तिढा सोडवला होता महाभारतामध्ये. आश्चर्य व्यक्त करून. पण प्रत्येक मृत्यू नंतर थोडे अधिक प्रगल्भ होऊन या मृत्यूचे चिंतन करू या. कारण तो अपरिहार्य असल्याने चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय बनला पाहिजे.

आज लष्कर प्रमुखांसह १४ जणांच्या मृत्यूच्या बातमी नंतर भरकटलेल्या मनात आलेले काही स्वैर भाव.

सुनील देशपांडे.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन