अखेर कलम ३७० उडाले.
लेखांक ७३*
सुमारे ७५ वर्षाच्या राजकिय इतिहासामध्ये २०१४ साली प्रथमच संपूर्णपणे काॅंग्रेसपेक्षा वेगळ्या विचाराचे संपूर्ण बहुमतातील केंद्र सरकार भारतामध्ये अस्तित्वात आले. त्याच्या येण्यामागे १०० वर्षांची राष्ट्रीय विचाराने भारावलेला जनसमुदाय उभा करण्याच्या प्रयत्नांची साखळी, व त्यांना एकत्रित करून शक्तीरूप दिलेली संघटना ह्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच. यापुर्वी जी सरकारे आली ती काॅंग्रेस किंवा काॅंग्रेसेतर अशा स्वरूपाची होती. त्यामुळे सामान्यांच्या आकांक्षांचे ते १००%प्रतिनिधी ठरू शकतं नव्हते ही त्यांची समस्या होती.
या विषयीची अगतिकता व उद्वेग श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आमचे एकट्याचे बहुमत नाही म्हणून कलम ३७० हटवता येत नाही, असे म्हणून व्यक्त केला होता. जनसंघाच्या निर्मिती पासून ह्या ध्येयात कधीच फरक पडला नव्हता.
२०१४ साली फक्त स्वबळावर भाजप सत्तेत आला कि ज्याच्या सर्व अवतारात, जसे जनसंघ, जनता पक्ष, भाजप, ३७० कलम हटवणे हा प्रमुख मुद्दा होता. त्या दिशेने भावनिक वायुमंडळ हे तयार झाले होते, पण आता आवश्यकता होती तांत्रिक विजयाची सुध्दा.
अत्यंत धोरणी व ध्येयवादाविषयी स्पष्टता असलेले राजकीय नेतृत्व मिळाले व सतत अपमान व अपयशाचे कडू घोट घेणा-या हिंदू समाजाला अचानक यशाचा अमृत घोट मिळाला. एक अत्यंत अभ्यासपूर्ण योजना बनली. प्रथमच पंतप्रधान लष्कर व सामान्य काश्मीरी जनतेत गेले, विश्वास संपादन केला. अतिरेक्यांविरूध्द मानवाधिकारी पंचमस्तंभीयांना न जुमानता कठोर कारवाई सुरू केली. व प्रत्यक्ष विकास ढोल ताशे वाजवत काश्मिरी जनतेला थेट दिला.
आश्चर्यकारक वाटावे असे मेहबुबा मुक्तींबरोबर सरकार बनवून स्वकियांच्या शिव्या खात बुद्धिबळाच्या सोंगट्या खेळत राहिले. कुठलाही
बौद्धिक पाचपोच नसलेल्या स्थानिक विरोधी पक्षांना, राष्ट्रीय पक्षांना व बौध्दिक परान्नावर जगणा-या व मुद्दलात स्वप्रकाशाची पूर्ण वानवा असलेल्या डाव्यांना प्याद्यांची भूमिका सुध्दा पार पाडता आली नाही.
पाठिंबा काढून घेतला. राष्ट्रपती राजवट आली, गृहमंत्रीपदी शहा आले व अचानक लोकांना कलम ३५ म्हणून काही असते हे कळले. प्रांताच्या सीमा बदलल्या गेल्या, काश्मीर मध्ये उपद्रवी तुरुंगात पडले, व संसदेत ३७० उडाले. जागतिक स्तरावर हूं की चू नाही. मुस्लिम देश शहामृगी पवित्र्यामध्ये. व त्याचवेळी काश्मीरी सामान्य जनतेला हे कळू दिले कि केंद्राचा पैसा येत होता पण तो चार घरातच जात होता. एखाद्या रहस्य कथे सारखा वाटावा असा निर्णय यशस्वी झाला कारण सामान्य भारतीय हा खरा कथा नायक होता.
थोडी परिणामांची चर्चा पुढील लेखात.
सुनील देशपांडे.
Article (74/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment