भारतातील विद्यापीठे
नालंदा तक्षशिला सोडून काही नावे घेता येतील का? काल ३/४ तास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर काढले व एका नवीनच विद्यापिठाचा शोध लागला. सज्जन व समजुतदार समाजाचा प्रभाव व संख्या याचा शोध लागला.
पुण्यातील पाऊस झाला होता. गाड्यांची गणित गंडली होती. चिडचिड व राग संताप व्यक्त करायला याहून योग्य वातावरण नव्हते. अशा वातावरणात हे विद्यापीठ मानवी व्यवहारातील समजुतदारपणा, संयम, सुसंस्कृत व्यवहार याचे प्रशिक्षण देत होते.
हे विद्यापीठ आहे की नाही हे ठरवण्यासाठी सॅंपल सर्वेमध्ये लबाडी नव्हती. भरपूर संख्या होती. म्हणजे गर्दी होती. तरूण पोरं पोरी होत्या, म्हातारे कोतारे होते, मध्यमवयीन जबाबदार होते, सर्व भाषांचे सूर कानावर पडत होते, बॅगांपासून बोचक्यां पर्यंतचे सामानाचे प्रकार सर्व आर्थिक स्तरांची जाणीव करून देत होता.
अशा सर्व असमान घटकांमध्ये एक साम्य होते, अडचणींचा बाऊ न करता, सहकार्य करून मार्ग काढायचा.
एवढस टीचभर स्वारगेट स्थानक त्यात अवाढव्य गाड्या शेकड्याच्या संख्येने ये जा करत होत्या. पावसाच पाणी चिखल होऊन पसरलेले, शेकड्यांनी लोक किमान २/३ तास खोळंबून उभी होती. चौकशीच्या खिडकीवर किमान २५/३० लोक वेगवेगळ्या भाषेत एकाच वेळी असंख्य गाड्यांची चौकशी करत होते असे दृश्य या स्थानकावर होते. गाडी काय मी आणणार आहे का? असे कातावलेले प्रश्न न विचारता ही गाडी या रसवंती गृहासमोर उभी आहे, ती गाडी पिंपळाखाली आली आहे. ही गाडी मुख्य दाराजवळ आहे हे सर्व तेथील पुरुष महिला कर्मचारी शांतपणे करत होते व त्यावेळी रात्रीचे बारा वाजून गेले होते. आगत्याने तुमची गाडी त्या कोप-यात येणार आहे काका. २ तास उशीर आहे,तुम्ही बसून घ्या असा सल्लाही दिला जात होता. हे करणारे कर्मचारी काहीच दिवसांपूर्वी सरकारशी तुटपुंज्या पगारवाढीची निकराची लढाई निर्णायक हारले होते. पण काम एवढ्या आत्मियतेने करत होते कि जणूकाही येथे काही घडलेच नव्हते. स्थितप्रज्ञता अजून काय असू शकते. तसेच त्यांचे चालक वाहक सहकारी. सगळीकडे स्वतः चे काम असल्यासारखे ओरडून गाडी भरण्याचा प्रयत्न करत होते. व असंख्य गावे कोणती गाडी भराभर लोकांना सांगत होते. प्रत्येक कर्मचारी चालता बोलता encyclopaedia होता. ही त्यांची पगारी जबाबदारी नव्हती पण सामान्य माणसाचा सेवाभाव तेथे स्वाभाविक प्रकट होत होता. मनोरुग्ण प्रवाशाला सुध्दा या धकाधकीत न रागावता सेवा देताना पाहिले.
सामान्य माणूस. तो तर कातावलेला होताच ना? त्याची चूक नसताना तो त्या दमट गर्दीत २/३ तास उभा होता. गाडीची announcement झाली कि सगळ्यांना घेऊन पळत होता. परत परत मास्तरांना विचारत होता, नकारार्थी उत्तर घेऊन ही गप्प होता. पण कुणाच्या माथी आपली भडास काढत नव्हता. समजून घेत होता.
बाकडी संपली होती, तरूण पोरं पोरी उभी होती. तरूण असल्याने त्यांनी ते संकटही संधीत रुपांतरीत करून घेतले. तरूणपणातील रात्र रगेत घालवत होते. पण कोणी काय Announcement झाली म्हणून विचारले तर नीट सांगत होते. त्या वयाला न शोभणारा समंजसपणा पुरेपूर प्रकटत होता. एकही तरूण पोरगा बाकड अडकवून बसला नव्हता.
तर बाकडी संपली पण प्रतिक्षा संपली नसल्याने जमिनीवर फतकल मारायला न लाजणा-या बहुसंख्य बायका जमिनीवर बसल्या होत्या. पण कर्म माझ हा भाव नव्हता. अडचणींशी सामना होता. हसत खेळत चालू होतं. पण त्या जमिनीवर हावरी मालकी सांगत नव्हत्या. कोणी जाणार असेल तर चेह-यावर आजिजीच हसू आणून जागा देत होत्या.
या माझ्या तीन तासात वरच्या पट्टीत ओरडत होता फक्त माईक. बाकी सारे निवांतपणे मार्ग काढत होते.
याच काळात आमच्या एका मित्रांच्या व्हाटस् अप ग्रूप वर राजकारण्यांमुळे कस सगळं वाईट आहे, काही खर नाही व. चर्चा जोरात चालू होती. त्या विरोधाभासात ही प्रशिक्षण प्रक्रिया मला कदाचित अधिक भावली असेल. संकट क्षमता वाढवण्यासाठी आहेत असे मानून संयम धीर स्व क्रियाशीलता शिकवणारा हा मनात खोलवर संस्कार करून गेला.
अखेर जेथे आपण शिकतो ते विद्यापीठ ना? मग स्वारगेट बस स्थानक हे विद्यापीठ का नाही?
सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment