शरद राजगुरू गेले

शरद राजगुरू गेले

      लहान मुल जसे आश्चर्यचकित झाले की आ वासून बसतात तसे शब्दागणित आ वासायला लावणारी ज्ञानगंगा म्हणजे शरद राजगुरू काल कालवश झाले.

पुरातत्व या नावा इतक्याच अगम्य विषयातील विश्वमान्य विद्वान ही त्यांची सामान्यांना अगम्य अशी ओळख. पण येथे तो माझा मामा होता ही ओळख करून देणार आहे. मला ढेबरभाई म्हणायचा. चल रे माझ्या बरोबर राजस्थानला. तुला वाळवंट कसे पहायचे ते सांगतो. पुर्वांचलाचा दगड अन् दगड, ओढान ओढा अभ्यासलेला जादूगार म्हणजे शरद राजगुरू. जादूची पोतडी उघडावी असे हरकून टाकणारी माहिती बाहेर पडू लागायची. ओतप्रोत भरलेले ज्ञान रसाळ व ललित पध्दतीने पाटातील पाण्यासारखे वाहू लागायचे व शास्त्रातील श ही न कळणारी आम्ही सगळी मंडळी तासतासभर डुलत रहायचो.

अणुस्फोटासाठी पोखरणच का? सरस्वतीचा प्रवाह, रामसेतू, तमिळ भाषेचे पुरातनत्व, प्रवरेच्या प्रवाहाचा इतिहास, काहीही विषय असेल पण तुम्ही गोष्टी वेल्हाळ अशा ज्ञान सागरात डुंबत रहाणारच व त्या शरदमामाने तर काळालाच २५/५० हजार वर्षांपूर्वी थोपवून ठेवलेलं असायचं. त्यानी फिरवून कालचक्र परत वर्तमानात आणल्यावर त्याची आवडती कॉफी बनवली जायची.

पण या अगम्य विषयावर अनेक जण खूप काही सांगतील पण अपरिचित तरीही मोठा माणूस मोठा का असतो हे सांगणारे काही गुण येथे नमूद केलेच पाहिजेत. मामाचे ज्ञानमार्गी जीवन कसे घडले असेल. तर त्याच्या नेणते पणाच्या स्विकारातून, असे मला वाटते. जशी जशी ज्ञानाची खोली वाढत होती तशा तशा अज्ञेयाच्या नवीन वाटा त्याला खुणावत असायच्या. त्यामुळे कुणी साधी गोष्ट सांगितली तरी, वा खूप छान सांगितले,मला माहिती नव्हतं असे सहज वाक्य जात असे. व हे मनापासून असे. ज्ञानाने माणूस लीन होतो, त्याला अज्ञानाचा आवाका येतो हे मी ऐकलेले होते पण मामा हे त्याचे प्रत्यक्ष रूप मी पाहिले आहे.

ज्ञानाने नाही तर अहंकार हा माहितीने (information) येतो हे मला मामाकडे पाहून कळलं. ज्ञानलालसा एवढी होती कि अहंकार मिरवण्यासाठी त्याच्याकडे वेळच नव्हता. साधेपणा तर एवढा की पिशवी घेऊन मंडई भेटायचा, मुलाच्या दुकानात सापडायचा, कोणताही नातेवाईक गेला तर स्मशानात भेटायचा. मी खूप विद्वानांना भेटलो आहे व साधारणपणे त्यातील कोणालाही वेळ नसतो. पण मामा सगळ्या सामान्य घरगुती गोष्टींसाठी उपलब्ध असायचा. त्याला कधी काहीच आडव आल नाही. त्यामुळे ज्ञान या शब्दावर माझे प्रेम व विश्वास खूप वाढला.

दगड विटा खापर या निर्जीव गोष्टींना सहज जीवंत करू शकणारा मामा जिवंत माणसांना तर स्वाभाविकपणे सहज भारून टाकायचा. पण जसे दगड विटा चुन्यातून घर बनते व ते निर्मिती ठरते तद्वतच त्यांने हात लावलेल्या खापरांनी तर प्रत्यक्ष एक एक संस्कृती उलगडून दाखविली होती. साधु संतांनी सजीव निर्जीव एक करून दाखवले तर या आधुनिक ज्ञानवंतांने दगडांना बोलके केले व महत्वाचे म्हणजे आम्हा सामान्य लोकांना ते ऐकवले. म्हणून म्हटले की ज्ञानभाराने अहंकार शून्य झालेला माझा मामा असा होता.

वयाच्या ८० नंतरही पांडुरंग बलकवडे आले की कसब्यातील जुना वाडा पाडला आहे तर २०/२५ मिटर खोल त्या टपो-या लिफ्टने जाऊन आपल्या पूर्वजांना आपल्यात आणून दाखवायचा.  शरद राजगुरू यांचे शोध घेणे हे शेवटी परमेश्वरलाच स्वतः पुढाकार घेऊन थांबवावे लागले.

अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणा-या काळखंडात शरदमामाची एक गोष्ट सांगायलाच पाहिजे. तो अत्यंत आस्तिक होता. सध्या या विषयावर उथळ पाण्याचा एवढा खळखळाट आपण ऐकतो त्यावेळी खरे ज्ञानी जन कसा विचार करतात ते मला अनुभवायला मिळाले. जर देवासमोर समाधान मिळत असेल तर अर्धवट माहिती वर त्याला खोटा ठरवण्यापेक्षा खर काय हे शोधू या हीच ती ज्ञान साधनेची वाट त्याने धरली व आम्हाला श्रध्देची लाज वाटू दिली नाही.

जगभरातील ज्या ५० विद्वानांना लाखो वर्षांच्या पृथ्वीच्या निसर्ग चक्राच्यावर अधिकार वाणी बहाल झाली होती.(fellow) अशातील एक व एकमेव भारतीय, असा ज्ञान तपस्वी पण शेजारून गेला तरी अहंकाराचा दर्प येणार नाही असा माझा मामा, विद्वान शरद नरहर राजगुरू काल गेले.

माझी श्रध्दांजली.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन