रज्जूभैय्या चतुर्थ सरसंघचालक

तसे तर आखीव रेखीव संघटनेमध्ये निर्मात्या नंतरच्या प्रमुखांना त्या संस्थेचे सुचारू रूपाने चलनवलन करण्या व्यतिरिक्त फारसे स्वतः चे अस्तित्व वा प्रभाव त्या संस्थेवर अथवा त्यायोगे समाजावर पाडता येत नाही. व ते बराच अंशी खरे आहे.

पण यातूनच अशा प्रमुखांच्या वेगळ्याच गुणांचा परिचय होऊ शकतो. तो रज्जूभैय्या यांच्या जयंतीनिमित्त आपण करून घेऊ शकतो. व अधिनायकवादाच्या प्रभावाच्या बाहेर पडण्यासाठी मदतही होईल. चतुर्थ सरसंघचालक माझ्या दृष्टीने एका वैशिष्ट्यपूर्ण संघ गुणाचा परिचय करून देतात. ते पहिले संघचालक आहेत ज्यांनी डॉ हेडगेवार यांना अनुभवलेले नाही, व पाहिले सुध्दा नाही. व संपूर्ण वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी वरून आलेले आहेत.

तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्याचा अट्टाहास केला नाही. संघ जसा चालला पाहिजे तसाच चालवला. मी नवीन दिशा देत आहे हा अट्टाहास चालवला नाही. संघ रचनेत मी नाही हे स्व कृतीने शिकवले ते रज्जूभैय्या यांनी. कोणतीही सामाजिक संघटनेचा फुटीचा इतिहास तपासला तर जाणवेल की नव नियुक्त प्रमुखाने मीपणा सिध्द करण्यासाठी घाईगर्दीने प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला व फक्त खळखळाट होऊन तारू बुडाले. मीपणा सोडलेल्या रज्जूभैय्या यांनी या गुणावर संघाचे तारू सुचारू रूपाने चालविले व वृध्दिंगत केले व कालोचितही ठेवले. त्यांच्याहून अधिक वयाच्या व अनुभवाच्या कार्यकर्त्यांबरोबर काम केले व सिध्द केले की मी नाही आम्ही हाच संघटन यशाचा मंत्र आहे.

हा गुण एवढा वेगळा आहे की व्यक्ती परिचयाच्या सामान्य संदर्भात याचा विचारच होत नाही. 

पण हे व एवढेच रज्जूभैय्या नाहीत. सौभाग्यवश मला जो थोडा सहवास मिळाला त्यातील वैशिष्ट्यपूर्ण रज्जूभैय्या आपल्या समोर ठेवतो. एकदा रज्जूभैय्या भुसावळ मार्गे प्रवासात चालले होते. भुसावळ येथे डबा द्यायचा होता. काहीतरी गडबडीने आम्ही थोडे उशीरा पोहोचलो. रज्जूभैय्या फलकावर समोरून चालत येत होते. अरे फलटाची लांबी मोजून आलो. कायम डोक्यात गणित व हिशोब. संघ म्हणून माणसांचा हिशोब. नाशिक मधील प्रवासात बौध्दिक वर्गाची उपस्थिती घेतली गेली नव्हती. परतीच्या प्रवासात त्यांनी सांगितले,आज उपस्थिती ६५० होती का? त्यांनी उभ्या उभ्या संख्या मोजली होती. रज्जूभैय्या यांचा परिचय वाचला तर कळते व आश्चर्य वाटते कि ह्या व्यक्तिमत्वाला संघ हा स्वयंसेवकांना शिकवण्यासाठी किती सामान्य गोष्टींमध्ये रस घ्यायला लागायचा व त्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये किती परिवर्तन केले होते.

सरसंघचालक पदावरून निवृत्त झाल्यावर रज्जूभैय्या पुण्यात रहात असत. त्यावेळी माझे वडील चित्रकार देशपांडे यांच्या डॉ हेडगेवार या चित्ररूप पुस्तकाचे प्रकाशन मा मोहनजी भागवत यांचे हस्ते होते. रज्जूभैय्या पूर्णवेळ कार्यक्रमास उपस्थित राहीले. स्टेजवर आले नाहीत, समोर प्रेक्षकात बसले होते. मला रज्जूभैय्या यांनी संघ व्यवहार असा शिकवला. एवढा सहज वावर तर मी कधी अनुभवला नव्हता. एकदा माझ्या वडिलांना भेटायला व डॉ हेडगेवार यांच्या चित्र प्रदर्शनी वर चर्चा करण्यासाठी घरी आले असताना, अनवाणी पायांनी आमची सगळी बाग उत्सुकतेने पाहीली. कौतुकाने पाहिली. जेवढी चर्चा चित्रांची केली, तेवढीच चर्चा त्या बागे विषयी, त्यातील पाण्याच्या पाटाविषयी केली. मला हा प्रसंग महत्वाचा वाटतो कारण माझ्या वडिलांच्या स्मरणात बागेत फिरणारे रज्जूभैय्या आठवत राहिले.

रज्जूभैय्या यांच्या अनेक गुणांविषयी खूप काही लिहिता येईल पण संघ यशस्वितेसाठी मीपण नाकारलेले रज्जूभैय्या हेच सर्वात महत्त्वाचे व म्हणून स्वतः चे स्वतंत्र अस्तित्व झाकून संघ तारू हाकणारे दर्यावर्दी रज्जूभैय्या मला कायमच गारूड घालतात.

सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन