भारताची आत्मचेतना जागवणारा राज्याभिषेक
शिवराज्याभिषेक म्हणजेच खरं तर हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव मृगेंद्रता याची आठवण करून देण्यासाठी आजपासून ३५० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी घडवलेला कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयाचा जल्लोष करण्याची सवय मोडलेल्या हिंदू समाजात विजयी चैतन्य जागवण्यासाठी घडवून आणलेला चैतन्य जागरण कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक.
वडिलोपार्जित गादीवर वडिलांच्या नंतर वारसाहक्काने बसण्याचा एक तांत्रिक उपक्रम म्हणून राज्याभिषेक नव्हता. तर हिंदू सरदार असतील, फार तर मांडलिक असतील पण स्वघोषित राजा असू शकेल? शक्यच नाही असे उत्तर खोटे ठरवून दाखवण्यासाठी केलेला त्या सहस्त्रकातील सर्वात रोमांचकारी उपक्रम म्हणून या शिवराज्याभिषेकाचा आठव करावयाचा आहे. म्हणून एका अर्थाने हा हिंदू साम्राज्य उत्सव आहे.
म्हणून हा संपूर्ण भारत वर्षाने साजरा करण्याचा दिवस व ३५० वे वर्ष आहे. यात फक्त गडकोट किल्ले किती जिंकले याचा हिशोब नाही तर हिशोब ठेवायचा आहे शिवाजी महाराजांच्या उद्दिष्टांचा. जी उद्दिष्टे या शिवराज्याभिषेकात व्यक्त होतात. म्हणून शिवाजी महाराजांच्या कोणत्याही रणांगणातील पराक्रमापेक्षा राज्याभिषेक हा श्रेष्ठ पराक्रम आहे.
यात सप्त सिंधूंचे स्मरण आहे, काशी विश्वनाथ मंदिर मुक्तीचे स्वप्न आहे, धर्मपरावर्तनाच्या प्रक्रिया सुरू करायच्या होत्या, फक्त महाराष्ट्र ही सीमा नव्हती तर संपूर्ण देश हे स्वप्नं होते, संस्कृत पुनर्जीवन हे उद्दिष्ट होते, हे सर्व जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवराज्याभिषेक होय. म्हणून शिवशाहीतील सुवर्ण क्षण म्हणून हा दिवस साजरा करू या.
या युग प्रवर्तक उपक्रमाचे काही पैलू पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे.
पुणे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment