एक मुलाखत कधीच न होणारी
एक मुलाखत कधीच होऊ न शकणारी
मुलाखतकार
सुनील देशपांडे.
नमस्कार डॉ. हेडगेवार.
नमस्कार.
मी: आपण वेळ दिल्याबद्दल आभार.
डॉ: आपण अधिक वेळ न घालवता मुद्द्यावर येऊ या का?
मी: हो निश्चितच. माझा पहिला प्रश्न आहे आपण ही नवीन संस्था स्थापन करून काय साधल आहे.?
डॉ: काहीच नाही. अत्ता तर सुरवात आहे, ध्येय साध्य करायचं आहे.
मी: काय ध्येय आहे आपल्या संस्थेचे?
डॉ: सांगतो. पण प्रथम नाव सांगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. व ध्येय आहे संपूर्ण हिंदू समाज संघटित करून ही भारतभूमी स्वतंत्र करणे.
मी: मग इतर सर्व संस्था काय करीत आहेत? स्वातंत्र्यासाठी तर प्रयत्नशील आहेत.
डॉ: माझा क्रम समजून घ्या. हिंदू समाज संघटित करून. हा इतर कोणाचाही नाही.
मी: पण यामुळे काय फरक पडणार? उलट स्वातंत्र्याला उशीरच होईल.
डॉ: असं घडेलही. पण हे काही फक्त सत्तांतर नाही तर या मध्ये स्व आहे व हा स्व म्हणजे येथील सनातन, नित्य नूतन संस्कृती, हिंदू संस्कृती व ती जपणारा पुत्रवत हिंदू समाज.
हा समाज ज्या निष्प्राण अवस्थेत आहे तो इंग्रज गेल्यावर कोणत्या मुल्यांवर हा देश उभा करणार, वैभवशाली बनवणार?
मी: ठीक आहे. पण एक बोचरा प्रश्न विचारू का?
डॉ: विचारा की.
मी: आपण क्रांतीकार्य का सोडले? तो मार्ग चूक होता का?
डॉ: स्वातंत्र्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न चूक नाही. खर तर साहेबाचे बुट पुसण्यापासून ते त्याच बुटाने गो-याच डोक सडके पर्यंत सर्व मार्ग योग्यच आहेत.
मी: क्रांतीकार्य का सोडले? घाबरलात?
डॉ: काहीही समजा. मी माझ्या वैयक्तिक स्पष्टीकरणात गुंतून हाती घेतलेल्या कामाकडे दुर्लक्ष करण्या एवढा मोठा नाही. पुढचा प्रश्न विचारा.
मी: आपण डॉक्टर झालात तर वैद्यक व देशसेवा असे का केलं नाही? दोन्ही गोष्टी गरजेच्या होत्या.
डॉ: मला शक्य नव्हते.
मी : डॉ. मुंजे?
डॉ : मी एवढा मोठा माणूस नाही. सामान्य कार्यकर्ता आहे.
मी: नुकताच तुमच्या स्वयंसेवकांनी मुस्लिमांच्या मिरवणूकीतून नागपुरातील हिंदू वस्त्यांवरील हल्ले परतवून त्यांना जबर धडा शिकवला. हे कसे शिकवले?
डॉ: आपला काही तरी गैरसमज होतो आहे. हे जागृत आत्मभान आलेल्या हिंदू समाजाचे संघटित यश आहे. स्वयंसेवक हिंदू समाजासाठी लढत नसून हिंदू समाजासह शत्रूशी लढत आहेत. स्वयंसेवक हिंदू समाजाचा भाग आहेत, समाजाचे तारणहार नाहीत. देशाचा भार संपूर्ण समाज उचलणार आहे न कि फक्त स्वयंसेवक.
मी: नागपुरात अजून सर्वत्र शाखा नाहीत. तरीही अन्य राज्यात कशाला धावपळ करताय?
डॉ: हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, नागपूर स्वयंसेवक संघ नाही. संपूर्ण हिंदू समाज संघटित करून क्रियाशील बनवायचा आहे, न की फक्त नागपूरचा.
मी: पण जरा अवघड रस्ता?
डॉ: हो पण एषा पन्था. म्हणून हाच मार्ग.
मी: आपल्या नंतर कोण पहाणार या संघाला?
डॉ: अहो हे काम पिढ्यानपिढ्या करायचे नाही आहे. याचि देही याचि डोळा पूर्ण करायचे आहे. वेळ थोडा व काम प्रचंड आहे. गतीने काम पूर्ण करणे आहे.
मी: हे स्वप्न वेडेपणाचे नाही वाटत?
डॉ: धन्यवाद. बर झाल माझा मार्ग वेडेपणाचा ठरवला. इतिहास तर वेड्यांचा असतो. वेडात मराठे वीर दौडले सात, यात वेडेपणा असतो.
हिंदवी स्वराज्य स्वप्न वेडेपणाचे असते. या थोरामोठ्यांच्या पंगतीत बसवलेत म्हणून धन्यवाद. हा वेडेपणा असेल तर संघ देशाचे भवितव्य घडवण्याचा इतिहास रचेल.
मी:एक शेवटची विनंती. आपणास काही भेट देऊ इच्छितो.
डॉ: माझी एक विनंती. मला मी मागेन ते द्याल.
मी: काय?
डॉ: तुमचा रोजचा थोडा वेळ द्या.
माझ्यासाठी प्रत्येकाचा रोजचा वेळ हवा आहे. द्याल?
मी: आश्चर्यकारक मागणी आहे पण खरच डाॅक्टर तुम्ही देह नाही ध्येय आहात.
मला वेळ द्यावाच लागेल, तुम्हाला कोणीच नाही म्हटले नसेल ना?
डॉ: हो. कोणीच नाही म्हटले नाही.
मी: लाखो लोकांच्या मदतीने कोट्यवधी हिंदूंना कार्यप्रवण करणं म्हणजे संघ.
बरोबर ना डॉक्टर.?
मुलाखत संपली. पण हेडगेवार यांचे काम झाले होते. त्यांनी अजून एक हिंदू कार्यप्रवण केला होता.
सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२.
विचार दर्शन घडवणारी मुलाखत..!
ReplyDelete