विठ्ठल कारभारी शिंदे
विठ्ठल कारभारी शिंदे गेले.
विठ्ठल भक्ती भवसागर पार करवते हे आपणास माहीत आहे. त्या भक्तीचे एक रूप म्हणजे वारी. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजायचा असेल तर एक वारी नगर जिल्ह्यातील शिर्डी या गावी कराविच लागते. या विठ्ठल कारभारी शिंदे नावाच्या दरबारी. तो दरबार आज उठला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काय रसायन आहे हे समजत नाही कारण आमचा परिचय विठ्ठल कारभारी शिंदे नावाच्या स्वयंसेवक जातीशी होत नाही. संघ समजावा म्हणून आम्ही संघ शाखेच्या तंत्राची माहिती मिळवतो. जरा अधिक म्हणून डॉ हेडगेवार व गुरूजींची चरित्रे अभ्यासतो. तरीही या अभ्यासकांसाठी संघ समजूत ही नेती नेती अशाच स्वरुपात असते. कारण त्यांना विठ्ठल कारभारी शिंदे नावाचा जातिवंत स्वयंसेवक भेटत नाही वा त्याला शोधल पाहिजे असे वाटत नाही वा देह नाही ध्येय असा स्वयंसेवक असतो हा परिचय करून देण्यात आम्ही कमी पडतो .
डॉ हेडगेवार हे ५१ वर्षाचं जीवन पुस्तकबध्द आहे पण हे लाखो सामान्य डॉ हेडगेवार हीच संघाची समजूत आहे व म्हणून आज पर्यंत शिर्डी येथे जाऊन विठ्ठल दरबारी संघ सहज समजावून घेता येत होता. आजपासून पूर्णविराम.
विठ्ठल कारभारी शिंदे हा गरीब
घरातील सर्वात मोठा मुलगा. जात शब्द पाल अंगावर पडल्यासारखी झटकणा-या दांभिक जगात जरी उच्चारायचा नसला तरी कथा नायकाचे महानपण व त्याहून अधिक स्वयंसेवकत्व कळण्यासाठी कि ते सांगणे गरजेचे आहे की ते माळी होते. आई फुलांच्या दुकानावर काम करायची. लहान असुनही कुटुंबातील मोठा असलेला विठ्ठल मदत करून शाळेत जायचा व नंतर काॅलेजमध्येही. सार्वजनिक नळावर आंघोळ तर स्वाभाविक होती. दारिद्रय रोज उशाशी बसून होते पण स्वाभिमानाने जगायच हे सांगणारी शाखा कायम हाताने धरून ठेवली होती. फक्त शाखा चांगला माणूस घडवत नाही. तर परिसरातील सोन्यासारखी माणस, दुर्दैवात सुध्दा चांगुलपणावर विश्वास ठेवायला शिकवतात. मित्रवर्य रावसाहेबांच्या आईने हे काम केले. सर्वत्र अंधार असतानाही विद्रोही न बनता समाज हितैषी विठ्ठलराव बनले ते या शाखेने व समाजातील चांगुलपणामुळे. म्हणून विठ्ठल दरबारी संघ समजला जायचा.
अपेक्षित तेथे उपस्थित नाहीत असा प्रसंगच अस्तित्वात नाही. त्यांच्या बरोबर काम केलेल्या मला व माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना असा एकही प्रसंग माहिती असणार नाही, हा संघ आहे हे कळण्यासाठी विठ्ठल दरबारी भेट आवश्यक पण अता विठ्ठलराव शिंदे नाहीत.
संघकाम यशस्वी कारण एकही कडी हातच राखून काही करत नव्हती. माझा खारीचा वाटा व त्यात कमतरता शक्यच नाही. एकदा रात्री अकरा वाजता उद्या सकाळी ११ पर्यंत ४०० पोळ्या हव्यात, ५० मैल दुरच्या गावात, हा निरोप मी विठ्ठलराव शिंदे यांना दिला व गप्प बसलो. सकाळी ११ वाजता पोळ्यांचे पोते पोहोचले. हा संघ विठ्ठल दरबारी समजायचा.
समता समजायची, जातीपातीच्या समन्वयातून हिंदुत्व समजावय चे, २४ तास उघड्या दरवाज्यातून समाज समर्पित संघ घर समजायचे, गरजेच्या ठिकाणी हाके आधी ओ येणारा अश्वस्त आवाज यायचा यातून संघ समजायचा. तो या विठ्ठल दरबारी.
आणि संघ यशाची ही सजीव वाटचाल करणारा वाटाडी अपरिचित विठ्ठल होता. गावोगावचे विठ्ठल होते. विठ्ठल कारभारी शिंदे या नावा आधी वा नंतरही परिचयासाठी सुध्दा मी नव्हता.
असा एक कार्यकर्ता म्हणजे संघ. म्हणून संघ परिचय म्हणजे सरसंघचालकांचे चरित्र नव्हे, चार प्रसिद्ध निष्ठावान कार्यकर्ते नव्हेत तर ओळख नसलेले पण शोधून भेटल्यावर जो संघ कळतो ती जिवंत संघ शरण माणसे म्हणजे संघ.
म्हणून विठ्ठल दरबार परिचय म्हणजे संघ परिचय. असे विठ्ठल कारभारी शिंदे, शिर्डी कर आज निधन पावले.
शिर्डी संघाने काय गमावले हे समजले तर मी विठ्ठल कारभारी शिंदे बनेन ही प्रतिज्ञा शिर्डीची प्राण ठरेल.
मनापासून श्रद्धांजली
Comments
Post a Comment