जखमा पुसल्या जातात, व्रण रहातात
करोना महामारी येऊन गेली, त्यातील तपशील अता विसरणीला लागले आहेत. त्यापूर्वी १०० वर्षे प्लेगची महामारी आली व त्यातील तपशील ही विस्मृतीत गेले. १९७५ च्या जून मध्ये लोकशाहीचा संकोच नव्हे निर्घृण हत्या करणारी आणीबाणी आली व त्यातील तपशीलही विस्मृतीत चालला आहे व अधिकाधिक धूसरच होत जाणार आहे.
या तीनही घटना समाज जीवनावर व समाज मूल्यांवर आघात, जखम करणा-या घटना आहेत . जखमा भरल्या जातात, येथेही त्या भरल्या जात आहेत. पण जखमेचा व्रण महत्वाचा असतो. तो पुसता येत नाही. तो रहाणे खूप महत्वाचे असते. आज आपण तो व्रण जपू या.
कोणते व्रण आहेत.? हे व्रण आहेत, त्या संकट काळात कोणती मूल्ये जपली गेली, ती मूल्ये म्हणजे त्या दुर्दैवी जखमेचे व्रण.
प्लेगच्या साथीत इंग्रजी अत्याचाराची जखम अता भरली आहे पण त्यातून जे देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटले, ते चाफेकर स्मरणाने, गोंद्या आला रे च्या गजराने आजही जिवंत आहे व हे व्रणच जिवंत ठेवायचे असतात. तपशीलाची फोलफट काळौघात उडून गेली तरी चालतात. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, गोडसे, पुण्याचे इंजिनियरिंग कॉलेज, तेथे बनवलेली गोळी हे व्रण स्मरणात ठेवायचे असतात.
करोना, त्याचे रौद्र रूप, मृत्यूचे थैमान, ही जखम झाली. त्याचे तपशील विसरले जातील. जायलाच हवेत पण स्मरणात व्रण रहाणार आहेत, त्यातून जन्माला आलेली मूल्ये आठवायची आहेत. वसुधैव कुटुंबकम ची तात्विक जाणीव जगाला झाली. वयं पंचाधिकम शतम चे व्यवहारीक वर्तन भारताने जगातील मोठ्या अविकसित भागाला लशी पुरवून दाखवले ती मूल्ये जागवावी लागतात.
पण या दोन्ही जखमा अस्मानी होत्या. पण भारतातील लोकशाही दमन ही सुलतानी जखम होती. त्याच्याही तपशीलाच्या जखमा भरत आहेत. भरल्याही आहेत. पण यातील मूल्ये रूपी व्रण मात्र तळहाताच्या फोडा सारखे जपायचे आहेत.
भारतातील लोकशाही ही अडाण्यांची कोकरागत चालणारी लोकशाही आहे हा पाश्चिमात्य व पुढारलेल्या देशांचा भ्रम भारतीय जनतेने उडवून लावला. हे मूल्य जपायचे आहे.
संघर्षक्षम वर्गाने संघर्ष केलाच केला व लोकशाही मूल्यांचे रक्षण आम्ही समाजानेच करायचे आहे हे मूल्य अधोरेखित केले. ते जपायचे आहे.
पण शंभर कोटीची जनता तर रस्त्यावर येत नाही पण ती मृतप्राय नसते. ती दबा धरून बसलेली असते व पहिली संधी मिळाल्या बरोबर तिचा स्फोट होतो. १९७७ च्या निवडणुकीत भारतीय जनतेने दाखवून दिले, लोकशाही मूल्यांचे रक्षण मतपेटीतून करू. अन्याय, अत्याचार व हुकूमशाही याचा बीमोड आम्ही करू. हे ते मूल्य, जे सतत स्मरणात ठेवावे लागणार आहे.
लोकशाही ही परकीय देणगी नाही तर भारतीय सहज स्वभाव आहे हे मूल्य, हे व्रण स्मरणात ठेवायचे आहे.
संविधानामधील We, the people याचा खरा अर्थ जगणारा भारतीय समाज हे मूल्य १९७५ ते १९७७ या काळ्या हुकूमशाही विरोधी लढ्यातून व निवडणूकीतील मतदानामधून सिध्द केले, ते स्मरणात ठेवावे लागणार आहे.
आणीबाणी विरूद्ध समाजातील सामान्य घटकांनी जो सर्वस्व गमावून संघर्ष केला, त्यातच या लढ्याच्या यशाचे गमक आहे. आणीबाणी विरूद्धचा संघर्ष एका वाक्यात वर्णन करता येईल. संपूर्ण भारताने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक भारतीयाला बरोबर घेऊन भारतावरील आणीबाणी रूपातील आलेले मानवी स्वातंत्र्यावरील सुलतानी संकट परतवून लावले.
जखमा विसरू या पण व्रण मात्र जपू या. पुढील काळातील एखाद्या संकटात ते दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शन करतील.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment