चंद्रायान तीन चंद्रावर जायला निघाले
चंद्रायान तीन चंद्राकडे निघाले
काल दुपारी चंद्रायान तीन चंद्राकडे निघाले.
भारतीय विजिगिषू वृत्तीचा प्रवास सुरू झाला.
मागच्या वेळी थोडीशी चूक झाली, किंवा नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होते. हाता तोंडाशी आलेला घास गिळता नाही आला.
पण अपयश पचवून पुनश्च हरि ओम म्हणले, त्यासाठी लागते ती विजिगिषू वृत्ती जागृत केली व कष्ट मेहनतीला प्रारंभ झाला.
पुन्हा किचकट गणिते मांडली गेली, व्यवस्था तपासल्या गेल्या, कृत्रिम चंद्र उभा केला, वातावरण आयात केले, तंत्रात बारीकशी सुध्दा उणीव ठेवली नाही पण यावेळी नियतीला साकडे घातले, अज्ञाताचेही स्मरण केले, बालाजीचे दर्शन घेतले,
व काल चंद्रायान तीन चंद्राकडे जाण्यासाठी अवकाशात झेपावले यशस्वीपणे. अता ४५ दिवस वाट पहायची, इंधनाला भर म्हणून करोडो शुभेच्छा बरोबर घेऊन चंद्रयान निघाले.
या आनंदात मिठाचा खडा ही पडला. विज्ञानाच्या यज्ञामध्ये अंधश्रद्धेची समिधा कशाला? ज्यांनी कष्टाने, प्रतिभेने, तंत्रज्ञानाच्या कौशल्याने हे घडवले होते, त्यांना यात काहीच खुपले नाही पण काहीच घडवायचे नसते त्यांना मांजर आडव घालवण्याशिवाय काहीच करायचं नव्हतं. पण असू द्यावे.
सुंदर चेह-यालासुध्दा काळी टीट लावाविच लागते ना?
विज्ञानाला अज्ञानाची लाज नसते किंबहूना अज्ञेयाचा शोध घेणे यासाठीच विज्ञान असते.
म्हणून बुध्दी बरोबरीने श्रध्दा सुध्दा मानवी विकासासाठी मान्य असते. शोधकाला अज्ञानाचे, अज्ञेयाचे महत्व कळत असते म्हणून तो कोणतीच गोष्ट नाकारत नसतो. मेंदू, मन सर्वच त्याला महत्वाचे वाटते.
पण श्रध्दा अंधश्रद्धा खेळ करणारे चार जण असू द्या, आपण भारतीय शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ, जनतेच्या विजिगिषू भावनेचा आदर करू या, आनंद घेऊ या, थोड्यांना नाही आवडली तर विज्ञानाच्या विजयासाठी प्रार्थना करू या.
परत परत विजिगिषू वृत्ती जागृत करू या. हा प्रयत्न यशस्वी होईलच. पण समजा नाहीच झाला तर.... तर परत पुनश्च हरि ओम करण्यासाठी ही वृत्ती जागी ठेवू या. अपयश आले तर परत प्रयत्न करू, अपयश पचवत यशस्वी होऊ. कारण विजिगिषू वृत्ती जिंकेस्तवर लढायला शिकवले. संकटाचे संधीत रुपांतर करेल.
शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ त्यांचे काम करतील, करोडो भारतीय प्रार्थना करतील. चंद्रायानाच्या इंधनाला, विजिगिषू शुभेच्छांशी शक्ति जोडतील. विज्ञानाच्या अज्ञेय शोधात भावनांचा प्रकाश टाकतील.
म्हणून ४५ दिवस सर्व समाज चंद्राकडे डोळे लावून बसले.
चंद्रावर पहिले पाऊल ही प्रत्येक अमेरिकनासाठी स्वभिमानाची गोष्ट आहे, प्रतिष्ठेची आहे. अजून ४५ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिले Landing आम्ही केले म्हणून सर्व भारतीय आनंदाने फुलून जातील. ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमानाची असेल, प्रतिष्ठेची असेल.
४५ दिवसांनी मिळणा-या यशासाठी आजच तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व संपूर्ण भारतवर्षाचे मनापासून अभिनंदन.
यशा आधीच अभिनंदन? होय कारण सततच्या प्रयत्नांचे हे अभिनंदन आहे, विजिगिषू वृत्तीचे अभिनंदन आहे, यशासाठी टाकलेल्या प्रत्येक पावलाचे आहे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment