धडपड्या मुलीची साठी
धडपड्या मुलीची साठी.
आज एका धडपड्या मुलीची, पद्माची साठी आहे. पण तिच्या स्वभावाने त्या वयाला मागेच कुठे तरी आडवून ठेवले आहे. कधी पंधरा असतं तर कधी पंचवीस, पण तिने कधीच वयाला चाळीशी पार करू दिली नाही.
उत्साह, उन्मुक्त जगणे याच बरोबर नवीन शिकतांना तर वय विशीतच अडकून पडत. सोशल मिडिया हा खरं तर स्वतःला व्यक्त करण्याची जागा पण पद्मासाठी मात्र काही तरी नवीन शिकण्याची, प्रयोगात आणण्याची जागा, व महत्वाचे म्हणजे कुतुहूल जाग ठेवण्याची जागा आहे.
तिची घरगुती स्थिती व तिनी गाठलेले वैयक्तिक आयुष्यातील यशाचे टप्पे याला काही ताळमेळच नाही. शिवाजीनगरच्या कोर्टात स्वतंत्र अस्तित्व असलेल्या महिला वकिलांची संख्या नगण्य, त्यातही कोणतीही पार्श्वभूमी नाही, आशिर्वाद नाही अशा महिला वकिलांची संख्या तर आणखीनच क्षीण पण त्यातील एक व खर तर म्हणता येईल की एकमेव म्हणजे पद्मा बोणटडकर वकील. पण हे एवढेच नाही. ऐन भरातील ती वकिली तुळशीपत्र वहावे एवढ्या सहजतेने सोडूनही दिली. जगायला किती पैसे हवेत याचा हिशोब केला, थोडे जास्त साठवले व पैशासाठीची धावपळ थांबवली. या प्रकारचे विचार खूप ऐकले आहेत पण कृती प्रत्यक्षात आणलेली एक पद्मा मी पाहिली आहे. प्रत्येक कृती काही तरी हटके असणारच.
संस्कृत शिकायला पन्नाशी गाठली. तांत्रिकदृष्ट्या बीए, एम ए. केल पण महाविद्यालयीन सह अध्यायांची काकू मैत्रीण बनली. या तरूण मुलींना नाच गाण्यासाठी हक्काची जागा व मैत्रीण मिळाली. वयाचे अंतर तिला थांबवत नाही. पण संस्कृत शिकताना वेदांत शिकली व संस्कृतला पूर्ण विराम दिला कारण काय तर तिच्या स्वामीजींनी जे सांगितले ते वेदांतात सापडले व शोध संपला. शोध संपला की लगेच थांबते, ओढत ताणत काहीच करत नाही म्हणून वयस्कपण तिथे फिरकतच नाही.
पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काय करावे म्हणून पिपिटी केली, त्यात एक वैशिष्ट्य मला शोधून सापडलं. बिएमसीसी ज्या मेरीट लिस्ट बोर्डवर एम काॅममध्ये विद्यापीठात सर्वप्रथम मध्ये हे नाव पाहिले, फोटो काढला. पद्मा श्रीनिवास बोंटडकर.
खळाळता उत्साह आजही तसाच आहे व स्वभाव बघता तो कधीच मावळणार नाही याची खात्री आहे.
तसे पद्मा ही बहु आयामी व्यक्ती आहेच पण आज फक्त या एकाच व्यक्तिमत्त्व आयाम मी मांडला कारण तो मला सर्वात भावतो.
प्रचंड happening वैयक्तिक आयुष्यात उपभोगलेल्या पद्माला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment