All the light we cannot see

ही नेटफ्लिक्स मालिका आहे. एक तासाचा एक असे एक तासाचे चार भाग म्हणजे ही मालिका. दुसरे महायुध्द संपत आले आहे. जर्मनीचा पराभव होत आहे. अशा वेळी फ्रान्समध्ये ही कथा घडते. छोट्या गावात ही घटना घडते.
जर्मन रेडिओ ऑपरेटर या गावात ड्युटीवर असतो. सक्तीने युध्दात ओढलेला असतो पण संवेदनशीलता जीवंत आहे. तेथे एक अंध तरूणी चोरून रेडिओ स्टेशन चालवत असते. अन्याय, अत्याचार या पार्श्वभूमीवर तरल,प्रेमळ जीवन जगण्याचा अट्टाहास दिसतो व शेवटी क्रौर्याचा पराभव होतो.
इतकी प्रत्ययकारी मालिका खूप दिवसांनी पाहण्यात आली. अत्यंत क्रौर्याने भरलेल्या वातावरणात तरल भावना इतकी सुंदर घेतली आहे की मालिका संपेपर्यंत त्या भावनेतून बाहेर पडता येत नाही.
एक एक फ्रेम एवढी जबरदस्त आहे की ती फ्रेमच एक कथा बनते. आपल्या अ़ंधळ्या मुलीला गावाचा रस्ता कळावा म्हणून लाकडाचे ते गाव तो बाप बनवतो व मुलीला बोट फिरवुन त्या गावातून फिरवतो ते दृष्य अफलातून आहे. भकासपणा सुध्दा एवढा सुंदर घेतला आहे की त्या भयाण एकाकी घरातही आपल्याला भावनेची गर्दी पहायला मिळते. सिनेमा हे दृष्य माध्यम आहे ह्याचा पुनः प्रत्यय या मालिकेत येतो. थोडे पण परिणामकारक संवाद व बाकी सर्व चित्रिकरण, अभिनय, नाजूक संगीत.
युध्दातील विकृत हिंसेमुळे जगातील कर्षतेतून दूर रेडिओत गुंतलेला प्रोफेसर क्रांतिकारक, हा या दोन्ही मुख्य पात्रांचा आदर्श, नायिकेचे प्रेमळ पण ध्येयनिष्ठ curator वडील, एका हि-यामागे लागलेला प्रमुख जर्मन अधिकारी एवढ्या पात्रांभोवती कथा नव्हे धगधगता अनुभव फिरत राहतो.
कथा जेते आणि जीत अशी न राहता अर्थपूर्ण डोळसपणे जागण्याची तीव्र इच्छा व त्यातील यश अशी रहाते. कथा संपताना फ्रान्स, जर्मनी अमेरिका काही लक्षात न राहता फक्त पुढील काळात एकत्र प्रेमाने व डोळसपणे जगू या एवढाच भाव शिल्लक राहतो. हेच या मालिकेचं यश आहे.
नेटफ्लिक्स वर आहे. जरूर पहावी.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन