राम मंदिर झाले पुढे काय भाग २
राम मंदिर तयार झाले आहे व भव्यदिव्य झाले आहे. हजार वर्षे टिकेल एवढे मजबूत ही झाले आहे. पण ते हजार वर्षे टिकेल म्हणजे काय? तर त्या मंदीरामधून जे संदेश हिंदू समाजाला मिळत आहेत ते हिंदू समाजाने समजावून घेणे व संपूर्ण समाज म्हणून त्यावर अमल करत रहाणे म्हणजे अयोध्या स्थित राम मंदीर टिकणे आहे.
आज आणखी एक संदेश टिपून घेऊ यात. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा हिंदू समाज, त्यातील संत महंत जेवढ्या उत्साहाने साजरा करीत आहेत, लगबग करीत आहेत, धावपळ करीत आहेत, तेवढीच किंवा काकणभर अधिकच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे, सरकार करत आहे, राजकीय पक्ष व कार्यकर्ते करीत आहेत व याला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त भाजपचे कार्यकर्ते नव्हे तर विरोधकही आमंत्रणाची आस धरून आहेत किंवा काही अति कडवे कानशीलावर बोटे मोडत बसले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भावना काहीही असतील व म्हणून ते भक्तीभावाने रामललाच्या गृहप्रवेशासाठी असुसलेले असतील पण ते उघडपणे देशाला २२ जानेवारी उत्स्फूर्तपणे व भक्तीभावाने साजरा करा असे सांगत आहेत. येथून आपला राम मंदिराकडून येणारा संदेश सुरू होतो आहे.
१९४७ साली देश स्वतंत्र झाल्यापासून व त्याही आधी पन्नास वर्षे संपूर्ण देशाला व त्यातही हिंदू समाजाला शासन व हिंदू रिती रिवाज, कर्मकांड, संस्कार, संस्कृती या परस्परविरोधी आहेत व म्हणून सर्व राजकीय व शासकीय व्यासपीठे ही फक्त हिंदू हिताला वर्ज आहेत अशी आफूची गोळी पाजण्याचे कार्य अव्याहतपणे चालू होते. मुस्लिम ख्रिश्चन हे अल्पसंख्याक म्हणून संविधानापासून सर्वत्र त्यांना स्वतः ची ओळख जपण्याचे स्वैर स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे भारतात हिंदू असणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे स्वरूप होते.
अशावेळी सुमारे तेवढाच १०० वर्षांचा काळ हिंदू समाजही संघटीत होत हे क्लैब्य नाकारून विजयी हुंकार देण्यासाठी प्रयत्न करत होता. रामललाने हिंदू तेजाला हाक घातली की समाजपुरूषा होई जागृत. त्यामुळे हिंदू समाजाने एकाचवेळी सरकारी शहामृगी पवित्रा व अल्पसंख्याकांच्या अरेरावीला आव्हान दिले व हे राष्ट्र माझ्या सांस्कृतिक संवेदना आधारे चालणार हे ठणकावून सांगितले. व म्हणून २०१४ साल अस्तित्वात आले.
राजकीय नेतृत्व, पक्ष, कार्यकर्ते यांना हिंदू समाजाने राष्ट्र संक्लपना समजावून दिली. ख्रिश्चन बहुल देशात बायबल पांथिक म्हणून सरकार विरोधी नसते, इस्लामिक देशात तर बघायलाच नको, तसेच भारतात हिंदू संस्कार हे सरकारात, शासकीय व्यवहारात बघायला मिळण्यात काहीच चूक नाही, नव्हे ते बघायला मिळणेच योग्य आहे. हे हिंदू समाजाने अयोध्या स्थित राम मंदीर निर्माण आंदोलन व निर्मिती मधून सिध्द केले आहे.
नरेंद्र मोदी ज्या उत्साहाने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होत आहेत ही परिस्थिती हिंदू समाजाने स्वकर्तृत्वाने निर्माण केली आहे. व म्हणून ती टिकवून ठेवण्यासाठी हिंदू समाजाने होय मी जागृत आहे, संघटित आहे व स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या शब्दात म्हणजे प्रतिक्रियाक्षम पण आहे हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे हा संदेश हे राम मंदीर भविष्यासाठी हिंदू समाजाला देत आहे.
या देशातील सरकार व शासकीय व्यवस्था ह्या सांस्कृतिक भारत उत्थानासाठी क्रियाशीलच राहतील व परत माघार घेऊन कोषात जाणार नाहीत हे डोळ्यात तेल घालून पाहण्याचे काम हे हिंदू समाजा तुझे आहे हा संदेश राम मंदिर भविष्यासाठी देत आहे.
अन्यथा राजकीय व राष्ट्रीय, सांस्कृतिक आशा आकांक्षा एक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले अथक परिश्रम आळवा वरचे पाणी ठरेल.
एक नेता हा कधीही चिरस्थायी परिवर्तन आणू शकत नाही, ते काम संघटित संपूर्ण समाजाला जागृकपणे करावे लागते हा संदेश राम मंदीराचा आहे. हे ध्यानात ठेवू यात.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment