राम मंदिर झाले पुढे काय भाग ७

ऐतिहासिक महत्त्वाचे क्षण म्हणून अयोध्या स्थित राम मंदिर पहावे लागेल. संपूर्ण समाजाने एकजूटीने एवढा प्रदीर्घ लढा, सर्व विपरीत परिस्थितीत लढून जिंकला आहे. व केवळ एक मंदिर म्हणून नव्हे तर समाज म्हणून एका प्रगल्भ समाजाची जगाला पुन्हा नव्याने ओळख झाली. म्हणून या ऐतिहासिक मंदिराच्या या हिंदू समाजाकडून काय अपेक्षा असतील या विषयी आपण अनेक लेखांमधून विचार केला. त्यातील अंतिम पुष्प.

जगामध्ये  सद्य स्थितीत भारत एका शालीन नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहे. पण काल पर्यंत तृतीय जग म्हणून हिणवला गेलेला देश, आज अचानक फक्त राजकीय नेतृत्व बदलाने ही परिस्थिती बदललेली नाही. राजकीय नेतृत्वाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून घेऊन वाटचाल केल्यानेच हे बदल घडून आल्याचे दिसत आहे.

त्यामुळे राजकीय नेतृत्वाप्रमाणेच समाजाने सुध्दा वैश्विक नेतृत्वाची धुरा सांभाळली पाहिजे हा संकेत हे राम मंदीर देत आहे. अर्वाचीन काळात हिंदू संस्कृतीच्या वैश्विक नेतृत्वाच्या जबाबदारीची जाणीव स्वामी विवेकानंद यांनी हिंदू समाजाला करून दिली तसेच विश्व समुदायाला, विस्फोटक उर्जेने परिपूर्ण हिंदू समाज व संस्कृती, आपले मार्गदर्शन करेल, असा विश्वास दिला होता. ११ सप्टेंबरला शिकागो येथे हा शंखनाद झाला होता व तो राजसत्तेने, प्रस्थापितांनी नाही तर एका संन्यासाने केला होता.

वैश्विक सामाजिक सहजीवन यशस्वी व्हायचे असेल तर फक्त परमत स्वीकार नाही तर परमत आदर करता आला पाहिजे,नव्हे तो स्वभाव बनला पाहिजे तरच विविधतेतील एकता कळू शकते. जीवनातील गोंधळ तर लगेच कळतो पण प्रत्यक्षात तो गोंधळ नसून त्यात सर्व सुरचित धागा आहे हे अनुभवणे आवश्यक आहे.

ही दोनही तत्वे समजावून घेतलेला हा हिंदू समाज आहे व फक्त तत्व म्हणून नव्हे तर हजारो वर्षांच्या प्रयत्नां मधून त्याने ती आत्मसात केली आहेत. परमत स्वीकार फक्त नाही तर आदर केला आहे. त्याचे तात्कालिक तोटे, नुकसान सोसले आहे पण तरीही आत्मसात केले आहे.  विश्वव्याप हा गोंधळ नसून त्यात एक सुसुत्रता आहे हे ही जाणून घेतले आहे. त्यासाठी पिंडी ते ब्रम्हांडी हे सूत्र फक्त शिकले नाही तर अनुभूतीही घेतली आहे. म्हणून हे जग ज्या शांत, निरामय जीवन पध्दतीची वाट पहात आहे ते देण्याची ऐतिहासिक जबाबदारी हिंदू समाजावर येऊन पडली आहे.

ऐतिहासिक अयोध्दास्थित मंदीर आंदोलनात हिंदू समाजाने वरील दोनही वैश्विक हिंदू मुल्यांचा नीट परिचय जगाला करून दिला आहे. सर्व प्रकारच्या विविधतेवर मात करणारी राम भक्तीची एकात्मता ही किती ताकदवान होती हे जगाने अनुभवले.

हीच आगामी भविष्यासाठी हिंदू समाजाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हिंदू समाजाने आपल्या व्यवहारातून विवेकानंदानी सांगितलेले हे हिंदू तत्वज्ञान सिद्ध करून द्यावयाचे आहे.

मागच्या लेखात आपण त्याची काही उदाहरणे पाहिली आहेत. अता असुसलेल्या जगाला हे तत्वज्ञान दोन्ही हातांनी भरभरून देण्याची वेळ आली आहे.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन