मला पडलेले गद्य स्वप्न
मला पडलेले गद्य स्वप्न
आज भल्या पहाटे जागा झालो. म्हणजे स्वप्नाने जागे केले. मला पडलेले पहिलं गद्य स्वप्न. रूक्ष स्वप्न. अन्यथा मला पडणारी स्वप्ने म्हणजे एक नितळ काव्य असते. भरभरून, रसरसून उत्साहीत व्हावे अशी स्वप्ने असायची.
नेहमी पडणारी स्वप्ने म्हणजे हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे असायची, एकदा तर कैलास पर्वतावर जाऊन आलो होतो. नखशिखांत भिजवणारा पाऊस, गरम कणीस खात असतो. वयाचा तर मागमूस नसतो. ३०/४० वर्षे तर आयुष्यातील भुर्र उडालेली असतात. ते काळेभोर केस परत डोईवर धड बसलेले असतात. माधुरी दीक्षित पासून ४/५ नट्यांना माझा नृत्याविष्कार पाहून दोन पदन्यास तरी याच्या बरोबर मिळावेत ही वासना स्पष्ट दिसते.
पुलवामात डोहलांना सल्ला देतो, ३७० कलम हटवण्यासाठी बैठक माझ्या सोबत होत असे, मंदीराच्या स्थापत्य कथा मी सांगत असतो. मुलाचे मेडल, बायकोचा कोर्ट appearance, तर नेहमीची बाब असते.
पण आज काय घडलं? आजचे स्वप्न साधे सरळ गद्य. मास्तर बोलतोय मी ऐकतोय. मतदान केलेच पाहिजे, सुट्टी म्हणून पळून जायचं नाही. नोटा दाबून अराजकाला साथ द्यायची नाही. माझा ध्येयवाद व पक्ष, उमेदवार यांची सांगड घालायची. देशहीत सर्वेतो परे हवे. चर्चा विकासावर हवी. ३७० कलमावर, सीएए वर हवी, सुरक्षेवर हवी, तंत्रज्ञानावर हवी, तरूणांच्या नोकरी धंद्यावर हवी, राम मंदिर निर्मितीवर हवी, स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या स्वप्नावर हवी, ताठ मानेने जगभर फिरणारा तरूण दिसेल ना, या चिंतेवर हवी.
असे साधे सरळ निरूपण झाले. स्वप्न संपले,जाग आली. अता विचार करत आहे. साधे सरळ गद्य स्वप्न असेल पण जर असे घडले तर ते एक भावी भारत नावाचे एक काव्यच असेल. माझ्या मताने लिहिले गेलेले.
मी करणार. आपण सर्वजणच करू या मतदान. सुंदर स्वप्नवत भारतासाठी.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment