विजय ही विजय है

विजय ही विजय है 

निवडणूक संपली. कवित्व चालू आहे. त्या वाहत्या गंगेत आपलही तर्पण.
निराशा येते. पण आपल्याला निराशा का आली? याचाही विचार केलाच पाहिजे. सध्या माहितीच्या अतिरेकी मा-यामुळे जमिनीशी नाळ नसलेल्या आपल्या सारख्या सामान्य नागरिकांच्या मनात कल्पनांचे अबलख वारू घोडदौड करत असते. व मग ४०० पार हे वास्तव वाटू लागते व मग वास्तव हे निरभ्र न वाटता झाकोळ वाटू लागते. मी पण त्या वास्तवाचा भाग आहे.

अशा वेळी जरा त्रयस्थ होता आले पाहिजे. मी ही प्रयत्न करतोय. मला आकड्यात शिरायचे नाही. मला माझ्या कल्पनेतील हिंदू हिताचा विचार करायचा आहे.

अगदी स्वतंत्र भारतात तामिळनाडूमध्ये प्रभू श्रीरामांच्या, चपलेचे हार घालून हजारोंच्या संख्येने निघालेल्या खास द्रविडी मिरवणूका आपण पाहिल्या आहेत. त्याच  तामिळनाडूमध्ये राम मंदिरामध्ये रामललांची प्राण प्रतिष्ठा श्रध्देने व उघडपणे करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लाखो हिंदू, हिंदू म्हणून जमत होते, जय श्रीराम च्या घोषणा देत होते व २,३% मत नसलेल्या भाजपला एकट्याला ११, १२% मत देतात हा मला हिंदू जागरणाचा विजय वाटतो आहे. केरळमध्ये खात खोलल हा हिंदू विजयाचा प्रासादिक अनुभव आहे. हिंदुत्वासाठी जीवनाच्या समिधा वाहिलेल्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाला ही एका अर्थाने चिरा व पणती मिळाली.
कुणाच्याही पांगुळगाड्या शिवाय तिस-यांदा सरकार चालवण्याची सुवर्ण संधी या हिंदू समाजाने लाडक्या मोदींना दिली हा तो विजय. हा फक्त विजयच आहे.

पण आम्हाला विजयातही victim card खेळायला आवडते. कस होणार हा आक्रोश करायला आवडते. म्हणून विचार केलाच पाहिजे, ज्यावेळी  हिंदुत्वाच्या प्रांगणात फक्त अंधार होता त्यावेळी केरळातील हिंदुत्ववादी तरुण कोणत्या स्वप्नावर स्वार होऊन बलिदान देत होते. तामिळनाडू मध्ये गाडून घेऊन कार्य करत होते. अयोध्येतील राम मंदिर संघर्ष चालू असतानाचे बलिदान कोणत्या आशेवर होते.

सर्व पूर्ण झाले आहे. २०१४/१९/२४ सतत हिंदू समाजाने भाजप सरकार निवडून दिले. अता आमच्या हातात आहे विजयाचा आनंद घ्यायचा की कल्पनेतील पराभवाने लज्जित व्हायचे.

विजय ही विजय है 

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन