सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि वैश्विक चिंतन

न दिसणारी गोष्ट पण जाणवत मात्र रहाते हे आपण अनुभवत असतो. राष्ट्रवादही  दिसणारी गोष्ट नाही पण जाणवत मात्र असते. संस्कृती दिसत नाही पण जाणवत रहाते. दिसणारी गोष्ट ही ऐहिक असते. जसे मानवी शरीर आहे, सर्व प्राणीमात्र आहेत, सजीव निर्जीव वस्तू आहेत. दिसत असतात, जाणवत असतात. तरीही जग तेवढेच नाही. शरीर जिवंत असते व अचानक ते मृत बनते. दृश्य स्वरूपात काहीच फरक नसतो, पण तरीही या दोन्ही गोष्टी भिन्न असतात व तो फरक कशामुळे पडला तो दिसत मात्र नसतो. रोजचा सुर्योदय सुंदरच असतो पण एका दिवशी तो आपल्याला खूप भावतो तर एका दिवशी तो उगाचच नकोसा वाटतो. कशामुळे हा फरक पडतो? ज्यामुळे हा फरक पडतो ते कारण दिसत तर नाही पण जाणवत मात्र रहाते.

हे जे जाणवणे आहे, वाटणे आहे, ते या सर्व ऐहीक गोष्टींना अर्थ निर्माण करून देतात. म्हणून ह्या जाणिवांना अनन्य साधारण महत्व आहे. या जाणीवा याच मानवी विकासाच्या प्रेरणा असतात. म्हणूनच  दिसत नसल्या तरी या जाणीवांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम मात्र अनन्यसाधारण असतो. किंबहूना या जाणीवाच ऐहीक जगाला अर्थ प्राप्त करून देतात. ऐहिक जगातील वा जगाला जे सौंदर्य, कुरूपता मिळते ती या जाणींवामुळेच मिळत असते. जे जाणवते पण दिसत नाही तेच या दिसणा-या जगाला अर्थ प्राप्त करून देते, एवढेच नव्हे तर नवनवे अर्थ उत्पन्न करून देते. व फक्त ऐहिक जगाची भावात्मक जाणीव करून देत नाही तर सर्व नागरीक शास्त्र हे या विकसित भावनेचं प्रतिक आहे. सह जीवन कसे नियमन करायचे, हक्क व कर्तव्य दिसतात थोडेच? पण तेच सुरळीत समाजगाडा चालवतात. म्हणूनच या न दिसणा-या भावना, संवेदना, या ऐहिक जगाला नियंत्रित करतात. जसे शरीरात मन हे भावनांचे कारक आहे तसेच समाज जीवनात संस्कृती आहे. दिसत तर नाही पण ती समाजाला समृद्ध करत असते, विकासाची प्रेरणा देत असते, समाज स्वास्थ्याचे नियमन ही करत असते.

त्यामुळे ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की जी गोष्ट ऐहिक नाही ती फक्त कल्पना विलास असते असे नाही तर आवश्यक असते, अपरिहार्य असते व प्रगल्भ मानवी जीवनाची गरजही असते. या जाणीवा, संवेदना यांच्या शिवायचे ऐहिक जीवन हे फक्त मृत जीवनच असेल. त्यामुळे या विश्वातील मानवी जीवन हे या संस्कृतीमुळे समृध्द, सुखकर व निरामय बनले आहे.

या संस्कृतीच्या अनन्यसाधारण महत्वामुळेच संस्कृती हा शब्दच सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी झाला आहे. राष्ट्र किंवा राष्ट्रवाद या शब्दाला स्पष्ट करताना अथवा राष्ट्र शब्द अर्थपूर्ण करताना संस्कृती शब्दाचा उहापोह अत्यावश्यक आहे, एवढेच नव्हे तर राष्ट्र हा शब्दचमुळी संस्कृतीशी तादात्म्य आहे.

आता आपण सांस्कृतिक राष्ट्रवाद ह्या संक्लपनेकडे येऊ यात. नित्य वापरून शब्दसुद्धा गोलमाल अर्थ प्राप्त करून घेतात. तसेच राष्ट्र या शब्दाबाबतही घडले आहे. राष्ट्र शब्द सहजपणे वापरून वापरून तो राज्य या शब्दाशी समकक्ष म्हणून वापरला जात आहे, त्यामुळे राष्ट्र शब्द हा फक्त भूभागाशी जोडला जातो आहे. व स्वाभाविकपणे संस्कृतीशी त्याचे असलेले नाते विरळ होत जाते आहे. व भूभागावरील ज्याचे राज्य ते त्या राजाचे अथवा सत्ताधा-याचे राष्ट्र असे समीकरण बनू लागले आहे. व त्यामुळे समान सांस्कृतिक मूल्ये सांभाळणारा समाज व त्या समाजाचे ज्या भूभागावर ह्रदयापासून प्रेम आहे तो भूभाग म्हणजे राष्ट्र हा तरल भाव मागे पडू लागतो. पण तो भाव सतत जीवंत रहात असतो.व कालांतराने हा भूभाग, मातृभूमी ही त्या प्रेम करणा-या समाजावर पुत्रवत प्रेम करू लागते, त्यावेळी माता व पुत्रवत समाज हे नाते निर्माण होते व त्याला राष्ट्र ही संज्ञा प्राप्त होते व ते राष्ट्र हे एक जैविक एकक तयार होते. व म्हणून भूमी पारतंत्र्यात पडली अथवा पुत्ररूप समाज परागंदा झाला तरी ते जैविक एकक तसेच अस्तित्वात रहाते. हा फरक  राज्य व राष्ट्र या संकल्पनांचा ये आहे. याची सहज सोपी समजणारी उदाहरणे म्हणजे एक पर्शिया जेथे भूमी कायम होती पण पुत्रवत समाजच स्वतः ची सांस्कृतिक ओळख हरवून बसला व पर्शिया हे राष्ट्र नष्ट झाले. या उलट ज्यू समाज मातृभमीपासून परागंदा झाला, म्हणजे पॅलेस्टाईन भूमीवरील राज्य नष्ट झाले पण पुत्रवत ज्यू समाज परत आल्यावर माता व पुत्रवत समाज एकत्र आल्यावर इस्त्रायल पुनरपि राष्ट्र म्हणून उभे राहिले.

पण राष्ट्र व संस्कृती यांचे नाते व राष्ट्र हे जैविक एकक आहे ही संकल्पना सप्रयोग प्रथम सिध्द केली व यशस्वी करून दाखविली ती भारताने. किंबहुना परमेश्वराने किंवा निसर्गाने ही संकल्पना सिध्द करण्यासाठी भारतही भूमी व पुत्रवत समाज म्हणून हिंदू समाजाची निवड केली असेही म्हणता येईल. व हजारो वर्षांपासून विविध प्रयोग करून राष्ट्र ही संकल्पना सिध्द केली व त्यासाठी विविध मूल्ये समाजात रूजवणारी संस्कृती येथील हिंदू समाजात रूजवली व एका अर्थाने सांस्कृतिक राष्ट्रवाद हा प्रयोग यशस्वी करून दाखविला.

विद्या वाचस्पति बाळशास्त्री हरदास या विद्वानांनी तर भारतीय राष्ट्रजीवन हे वेद कालापासून आहे हे सिध्दच केले आहे. व वेद निर्मितीचा कालखंड हा हजारो वर्षे जुना आहे. मानवी इतिहासातील सर्वात जुनी निर्मिती म्हणजे वेद यावर मात्र सर्वांचेच एकमत आहे व त्या काळाविषयी ज्ञान व अभिमान बाळगणारा समाज निरंतनपणे या भूभागावर वावरत आहे. त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवाद ही संकल्पना रूजण्यासाठी व यशस्वी सिध्द होण्यासाठी हे पुरेसे आहे. 
उत्तरम यत समुद्रश्च हिमाद्रैश्चव दक्षिणं
वर्षं तत् भारतं नाम भारती तत् संतति:.
असे विष्णु पुराणात केलेले वर्णन या भूभागाचे केले आहे. एवढे पुरातन पण सातत्यपूर्ण राष्ट्र जीवन या ठिकाणी चालत आलेले आहे.

तसेच या ठिकाणी अनेक राजे, राज्ये व लढाया यांनी तर इतिहासाच्या सर्व शाखा भरून वाहिल्या आहेत. त्यामुळे तर राज्य व राष्ट्र यातील फरक करणे अजूनच सोपे होत आहे.

भारतात कधीही एकच राज्य होते अशी परिस्थिती नव्हती. चक्रवर्ती राजा जरी झाला तरी इतर राज्ये असत की जी या चक्रवर्ती सम्राटाची मांडलिक असत. त्यामुळे भारतात राज्य म्हणजे काय? हे समाजाला नीट समजले होते. व राज्य संक्लपनेचे मर्यादित महत्वही समजत होते. राजा लढाई हरला तर जनता एवढी दु:खी होत नसे, जेवढी प्रभु रामचंद्र यांच्या वनवासावेळी झाली होती. हा फरक मूल्यांचा आहे. ही मूल्ये समाजात संस्कृती रुजवत असते. जर एवढी १७६० राज्ये असतील ते एक राष्ट्र कसे? याचे उत्तर म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद होय. व या सांस्कृतिक राष्ट्रवाद सिध्द करणा-या प्रयोगशाळेचे नाव आहे भारत. अत्यंत विविधतेने नटलेला भारत. सकृत दर्शनी कोणतेही साम्य न दिसणारा भारत.

या आपल्या भारताच्या विविधतेचे वर्णन तरी किती करावे? जमिनीत विविधता. राजस्थानच्या मरुभूमी पासून बर्फाच्छादित हिमालयापर्यंत सर्व प्रकारची जमीन या देशात आहे. सर्वोच्च ४५ अंश तपमानापासून उणे ४५ अंश तपमानापर्यंत सर्व प्रकारचे तपमान वैविध्य आहे. अतिवृष्टी पासून दुष्काळी परिस्थिती पर्यंत हवामान बदल आहे. कपड्यांमध्ये दक्षिणेत लुंगी तर उत्तरेत धोतर आहे. कपडे, दागदागिने यात तर विविधता आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे भाषा. भाषावैविध्यात तर दुरान्वये संबंध जाणवतं नाहीत अशा भाषा आहेत व दर बारा मैलाला भाषा बदलताना जाणवते. अशी प्रत्येक बाबतीत विविधता असताना हे एक राष्ट्र कसे? काय वैशिष्ट्ये आहेत? काही प्रयत्न आहेत का? कशी विचार धारा काम करते? हे सर्व अभ्यासणे, भारत अभ्यासणे म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद समजून घेणे आहे.

अशी कोणती एकात्मता सूत्रे आहेत की ज्यामुळे बाह्यातकारी विसंगती मधूनही हे राष्ट्र उभे राहिले आहे. भाषा विविधता जरूर आहे पण त्यातील एकात्मतेचे सूत्र आहे संस्कृत. एकमेकांच्या प्रदेशात भाषा कळताना अडचण आली तरी शब्द कळतात, कारण शब्द संस्कृतोद्भव असतात. एकात्मता अशी तरलपणे काम करते. संपूर्ण भारताच्या शेतीचा आधार गाय. म्हणूनच भारताच्या प्रत्येक काना कोपऱ्यात गाय हा उपयुक्त पशू नाही तर माता आहे. ही गौमाता एकात्मतेचे कारण आहे.देशभर एकच सांस्कृतिक तत्वज्ञान आहे. भगवत गीता. अशी भाषा नाही ज्यात गिता तत्वज्ञान नाही. सांस्कृतिक भारताचा तत्वज्ञान आधार आहे भगवत गीता. व सर्व भारताला नदी महात्म्य सारखेच माहिती आहे. म्हणूनच नदी ही सुद्धा देवीच आहे. म्हणूनच प्रत्येक नदी गंगा आहे. गोदावरी ही दक्षिण गंगा आहे. देवी आहे, आराध्य आहे. ही संस्कृती एकात्मता निर्माण करते व म्हणून या राष्ट्राची भूमि काही काळ पारतंत्र्यात राहीली तरी राष्ट्रीयत्व जिवंतच असते, भूमीशिवाय सुध्दा. सुंदर चित्रातील विविध रंगांच्या विविधताही चित्रकाराच्या एकात्म सुंदर चित्राला छेद न देता खुलवत असतात तेच संस्कृती बाबतही घडत असते. विविधतेली दडलेली एकात्मता संस्कृती शोधते व विविधतेतील सौंदर्य जपत ती एकात्मता वाढवत असते.

सांस्कृतिक राष्ट्रवाद हा राज्य विषयाच्या  संक्लपना कशा मोडून काढतो ते आपण दोन छोट्या उदाहरणांवरून पाहू. संपूर्ण देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळी आग्र्याहून सुटून निघाले ते दुसरे दिवशी रायगडावर आले नाहीत तर चार महिने शत्रू मुलखातून लपत छपत येत होते. कधी भगवी कफनी तर कधी देव दर्शनाची हुल देत महाराज पूर्वेकडे येत होते. हे का जमले असेल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद. भगव्या कफनीतील माणूस म्हणजे आपला माणूस, हिंदू माणूस म्हणजे आपला माणूस, हिंदू राजा कोणत्याही गावचा असो आमचा माणूस. औरंगजेब शत्रू तर शिवाजी महाराज आमचे. हे फरक शिकवते त्याला संस्कृती म्हणतात. म्हणूनच शिवाजी महाराज बाल संभाजीला विश्वासाने मथुरेत  ठेऊ शकले व मथुरेच्या सामान्य हिंदूंनी आपल्या राज्याच्या नाही पण राष्ट्राच्या युवराजाला सांभाळले. हे इतरत्र शक्य नाही पण भारतात घडले कारण येथे राष्ट्र ही सांस्कृतिक संक्लपना आहे.
असेच बाजीराव पेशवे यांचेही उदाहरण आहे. पुण्यात राहणारे पेशवे पण आईची इच्छा काशी विश्वनाथाच्या दर्शनाची जेथे यवनी अंमल. ही काशी विश्वनाथाची ओढ ही भारतीय संस्कृती. १००० मैल दूर पण तरीही जायचे कारण तो काळभैरव दैवत आहे माझे. बाजीराव पेशव्यांनी निरोप पाठवून आईस रवाना केले पण शत्रूची हिम्मत नाही झाली धार्मिक पर्यटन रोखण्याची. तसेच याच पेशव्यांना हाक मारली बुंदेलखंडाने. रक्षण करा. संपूर्ण भारत देश हीच मराठेशाहीची सीमा होती. कारण सांस्कृतिकदृष्ट्या भारत एक होता.

पण ही एकात्मता निर्माण कशी झाली? ती आपसुकच निर्माण झाली होती का?. तर आपसुक असे काहीच नसते. ती प्रयत्न पूर्वक निर्माण करावी लागते. व या भारतीय प्रयोगशाळेत त्या झालेल्या प्रयत्नांना सांस्कृतिक एकात्मता म्हणतात व ते दोन चार वर्षांचे नव्हे तर शेकडो वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्न होते, त्यावेळी या अमूर्त संकल्पना, संस्कृती व राष्ट्र ह्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत.


असे कोणते प्रयत्न झाले? सर्वात महत्त्वाचे साहित्य. वेद पुराणांपासून हे एक राष्ट्र आहे हे बिंबवले गेले. कवी कालिदास यांनाही मेघाचा प्रवास सांगताना भारताचे भौगोलिक दिशा दर्शन करावेसे वाटले, तर आधुनिक भारतात सुदूर तामिळनाडू मधील कवी सुब्रमण्यम भारती यांना II am India असे काव्यं करून तमिळनाडू मध्ये राष्ट्रीय भाव जागरण करावेसे वाटले. योगी अरविंद, विवेकानंद, लोकमान्य टिळक यांनी राष्ट्र ही जैविक संक्लपना आहे हे वेळोवेळी समाजाला समजावून सांगितले.जसे साहित्य तसेच धर्म आचरण. जर एकात्मता जाणवायची असेल तर आत्मियता हवी व आत्मियता ही संपर्काशिवाय शक्य नाही. मग यात्रा निघाल्या. हिंदूंना पुण्यासाठी काशीला जावे लागते व तेथील गंगातीर्थ सुदूर दक्षिण टोकाला रामेश्वरम् ला अभिषेक करावे लागते. उत्तर दक्षिण एकात्मता अशी साध्य झाली. ५२ शक्तिपीठे ही भारताची सांस्कृतिक सीमा दर्शवते. बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण भारताचे दर्शन घडवतात. आत्मियता निर्माण करतात. आपले परके हा फरक नीट समजावून सांगतात. त्यासाठी पुरावे लागत नाहीत. असा सनातनी हिंदू शिकतो की गौ रक्षक आमचा, गौ हत्यारा शत्रू. गीता त्याज ठरवून फक्त कुराणला सत्य मानणारा शत्रू, गंगा रामेश्वरी वाहणारा आमचा, गंगा जमना तहजीब शत्रू. हा संस्कार झाला म्हणून आग्र्याहून सुटका यशस्वी झाली. शंभू राजे मथुरेत सुखरूप राहू शकले व अयोध्येतील राम मंदीरासाठी ५०० वर्षे संघर्ष समाज करत राहिला, नेतृत्वाशिवाय.

प्रत्यक्ष परमेश्वर अवतार राम कृष्ण यांनीही सांस्कृतिक राष्ट्र उभारणी केली व अवतार कार्य संपवले. प्रभू रामचंद्रांनी अयोध्या ते श्रीलंका असा उत्तर दक्षिण भारत पायी प्रवास करून जोडला तर भगवान श्रीकृष्ण यांनी मेघालयापासून द्वारके पर्यंत पूर्व पश्चिम भारत देश जोडला. राष्ट्र अशा सांस्कृतिक आधाराने उभे करावे लागते. भारताने ते हजारो वर्षांच्या अथक प्रयत्नाने सिध्द करून दाखविले. इंग्रजांच्या देशाचे अस्तित्व नाकारणा-या कुटील बौध्दिक प्रयत्नांना म्हणून यश आले नाही की मार्क्सच्या dialectic history ला. कारण राष्ट्र ही सकारात्मक कल्पना आमच्या देशात संस्कृती आधारे शिकवली गेली म्हणून चिरस्थायी राहिली व संस्कृती आधारीत असल्याने लोककल्याणकारी राहीली.

म्हणूनच अर्वाचीन भारतात या राष्ट्राच्या सांस्कृतिक अवधारणांचा जल्लोष स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेत केला, जो जगाने स्विकारला, जगाला आत्मियतेने जोडणारा योग दिवस दिला, तसेच करोना काळात भयभीत जगाला व्यवसाय म्हणून नव्हे तर सेवा म्हणून लस दिली. या सर्व खुणा सांस्कृतिक राष्ट्रवाद स्पष्ट करतो. हे राष्ट्रीयत्व संस्कृती सह असल्याने आक्रमक नाही, अधिकारवादी नाही, आक्रांती नाही, विस्तारवादी नाही तर समन्वयवादी, सहकार्यवादी, समजूतदार, न्याय्य, धर्म्य आहे.

म्हणूनच सर्व जगाला या कल्पना भावत आहेत, समजावून घेण्याची इच्छा आहे. छोट्या वैचारिक डबक्यातून बाहेर यायचे आहे. अता गरज आहे या सांस्कृतिक राष्ट्रवादाची वैश्विक एकात्मतेला अहम भूमिका सिध्द करून देण्याची.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन