माझा सदरा हवा का कोणाला?
सुखी माणसाचा सदरा म्हणून एक गोष्ट होती. ज्यांच्या कडे सदरे होते ते सुखी नव्हते व एक सुखी होता पण त्याच्याकडे सदरा नव्हता. आजची माझी अवस्था मात्र त्रैलोक्य जिंकल्यासारखी आहे. आज मी सुखीही आहे व माझ्याकडे सदरा पण आहे.
काय घडलं आहे विशेष?
माझा मुलगा ऋषि नेहमीच मला स्वतःला अभिमानास्पद वाटेल असे काही ना काही तरी करत असतो. पण आज मात्र अतीच केले. थक्क केले. अभिमानाने उर भरून आले. पुर्वीचे त्याची प्रत्येक वेगळी वाट मी कौतुकाने पाहिली होती. पण आज.
ऋषि वय वर्षे २८. Corporate field मध्ये कामाला आहे. तेथील ताण तणाव सर्वांना माहिती आहेतच. त्यातून त्यांने वेळ काढून स्वयंपाकघरात पुरणपोळ्या केल्या. आधी आश्चर्यचकित केले व नंतर अभिमानाने भरुन टाकले. बापाने हे शेअर केले पाहिजे ना?
संपूर्ण पुरण स्वतःने केले. डाळ, गूळ प्रमाण बरोबर घेऊन, संपूर्ण पाणी जाऊन घट्ट होई पर्यंत पुरण हलवत बसला होता. हात दुखेपर्यंत व उडणारे अती गरम गुळाचे कण झेलत पुरण तयार केले, नंतर स्वतःच सर्व घाटले. हे सर्व अॉफिस संपवून रात्री दहा नंतर केले व आज त्याच्या कणीक मळण्यापासून ते उंडे बनवून पोळ्या करण्यापर्यंत सर्व गोष्टी एक हाती केल्या व प्रत्यक्ष पुरणपोळ्या केल्या. त्याही समाज माध्यमांवर लाईक करण्यासाठी एक दोन नाही तर १५/२० पोळ्या केल्या. व सर्व गोल, कंपास लावून कराव्यात अशा.
मी खाल्ल्या आहेत व म्हणून मी अभिमानाने म्हणत आहे की कुणाला माझा आज सदरा हवा आहे का? सुखी माणसाचा सदरा. माझ्या साठी आयुष्यभरासाठी एक सुगंधी आठवणीची कुपीच ऋषिने मला दिली आहे. विश्वास नसला तरी मनोमन ऋषिची दृष्ट काढत आहे. बापाचीच नजर नको लागायला.
कौतुक तरी किती करणार? म्हणून एवढेच म्हणतो, कुणाला हवाय का ह्या 'बाप' सुखी माणसाचा सदरा.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
सुखी माणसाचा सदरा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. पण त्याची गुरूकिल्ली सापडणारे फारच कमी असतात. सुखी माणसाचा सदरा ज्यांच्याकडे आहे असा माणूस आपल्या आजुबाजुला आहे हे आमचं भाग्य आणि ही जाणीव सतत जिवंत ठेवण्यासाठी झटणाऱ्या माणसांचं सुद्धा कौतुक.
ReplyDelete