हिंदू वैश्विक चिंतन जागरण दिवस

आत्मविस्मृतीमुळे हिंदू समाजाला, हिंदू धर्माला, हिंदू तत्वज्ञानाला, हिंदूराष्ट्राला, ( भारताला), आपले ध्येय विस्मरण झाले होते. याच्या स्मरणाचे प्रयत्न चालू होते. समाजात, राष्ट्रात, तत्वज्ञानात व धर्मतत्व रचनेत याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. पण अर्वाचीन भारतात त्याची सुस्पष्ट मांडणी ११ सप्टेंबर १८९३ शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली. म्हणून हा दिवस हिंदू वैश्विक चिंतन दिवस ठरला आहे.

जगाला आज हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, हिंदू नर नारी व भारत देश यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. जगाच्या मूळ समस्येचे उत्तर हवे आहे. जे की भारताने, धर्माने, तत्वज्ञानाने , हिंदू नर नारींनी व्यवहाराने त्या समस्येच्या मुळाशी जाऊन उत्तरही शोधले होते. जगाला सांगितले ही होते. विश्व समुदाय प्रवाही असल्याने त्याला या चिंतनाचे सातत्याने स्मरण करुन द्यावे लागते.
वेदकालापासून, भगवत गीते मधून, श्री महिम्न स्तोत्रातून, पसायदानातून चालत आलेले हे पाथेय, अत्यंत आधुनिक शब्दात स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये ११ सप्टेंबर रोजी मांडले आहे. म्हणून या दिवसाचे व हिंदू वैश्विक चिंतनाचे स्मरण केले पाहिजे. कारण जगाला हे हिंदू चिंतन समजून घ्यायचे आहे.
अत्यंतिक विविधतेमुळे विश्व समुहात सर्वत्र विरोधाभास आहे,  म्हणून संघर्ष आहे, आपपरभाव आहे, कुठेही एकात्मता नाही असे जगाला वाटते व म्हणून एकारलेल्या विचारांना प्राधान्य देऊन जग एकसारखं करायचा प्रयत्न झाला. पण त्याचे भयावह दुष्परिणाम जग भोगत आहे. मग अध्यात्मिकताच नको. फक्त भौतिकताच खरी म्हणून कम्युनिझमचा, रोगापेक्षा औषध भयंकर, असा प्रयोग झाला. पण पंचाहत्तर वर्षातच जगाने तो नाद सोडला. पण मग सह अस्तित्वाच्या आधारे सहजीवन कसे जगणार ? हा प्रश्न तसाच राहिला.

त्यावेळी हजारो वर्षांपासून या समस्येचे स्वयंसिद्ध उत्तर शोधलेल्या हिंदू विचारांच्या मागे जग आशाळभूतपणे धावत आहे. पण तो हिंदूच त्याची ओळख मधल्या काळात विसरला होता. त्याचे स्मरण करुन दिले स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबरला शिकागो धर्म परिषदेमध्ये. आधुनिक काळात सर्व जगाला स्वामी विवेकानंद यांनी हिंदू विश्व चिंतनाची जाणीव करून दिली व जबाबदारीची जाणिव करुन दिली हिंदू धर्म, तत्वज्ञान, नर नारी व भारताला.
विश्व रचना हा गोंधळ नसून एक सुंदर रचना आहे. ती विविधतेने नटलेली आहे व ह्या विविधतेतील सौंदर्य समजण्यासाठी हिंदू विचाराने जावे लागेल. वेगळेपणाचा फक्त स्विकार करायचा नाही तर सन्मान करायचा. Not only acceptance but respect. या आधारावर सह अस्तित्व स्विकारायचे. मग संघर्ष होणार नाही. यासाठी स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे वर्तन, हिंदू तत्वज्ञान व त्यातील उदाहरणे, भारत भूमि म्हणून विविधता व त्याच्या सांस्कृतिक एकात्मतेच्या आधारे समृध्द, शांत, व परस्पर सन्मानाने हजारो वर्षे जीवन जगणारे हिंदू नर नारी यांच्या मदतीने समजावून सांगितले आहे.

 हिंदू वैश्विक चिंतन म्हणून ११ सप्टेंबरला हिंदू समाजाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. विवेकानंदांनी अत्यंत योग्य शब्दात हे सांगितले. हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, हिंदू नर नारी व भारत देश हे सर्व मिळून जागतिक शांत, समजूतदार सहजीवनाचा वस्तुपाठ उभा करतात.

आज त्याचेच स्मरण आवश्यक आहे.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन