देवव्रत रेखे नी सावळा गोंधळ
देवव्रत रेखे नी सावळा गोंधळ
मला अनेक गोष्टींचा काय उपयोग असा प्रश्न पडतो. त्रिकोणमिती गणित मला रोजच्या जगण्यात कधी लागले नाही. माझा अडाणीपणा तर असा की हे जगण्यातले कोडे मला त्रिकोणमितीमुळे सुटले हेसुद्धा मला कळत नाही. मला आवकाश शास्त्रातील काही कळत नाही. चंद्रावर पाणी आहे का नाही? या वांझोट्या चर्चेचे महत्व काही कळत नाही . त्यामुळे यान चंद्राच्या दक्षिण का कुठल्यातरी ध्रुवावर उतरले तर काय एवढं विशेष घडल हे कळतच नाही. विचार करता करता लक्षात आले की आपल्याला तर कशातलच फारसं काही कळत नाही. पण सामान्य माणूस असल्याने एक बरं आहे की कोणी सांगितले की हा खूप मोठा पराक्रम आहे तर आपण आपला हात जोडून मोकळा होतो.
असलाच कसला तरी मानवी शरीर, बुध्दी, मन यांच्या क्षमतांचा कस लागेल असा जगण्यासाठी अभूतपूर्व पराक्रम सुनीता विल्यम्स यांनी केला. त्या अमेरिकेला एकेका जीवाच काय कौतुक? तर तिला आणायला लाखो डॉलर्स खर्चून त्या एलाॅन मस्कचे आवकाश यान भाड्याने ( येथे भाड्या ही कॅपिटॅलिस्ट मस्कला शिवी नाही याची नोंद घ्यावी.)घेतले. मला एका जिवासाठी एवढा खर्च ह्याचा उपयोग कळला नाही पण आपण आपलं सुनिताबाई, मस्क सगळ्यांच कौतुक करुन टाकल. पण भांडवलवादी शिक्का बसेल या सामान्य माणूस असल्याने भिती पोटी अदानी अंबानींना शिव्यांचा रतीब घातला व कर्तृत्व नसल्याने भिकारीपणाचा कुडता परत घातला.
अस अख्ख आयुष्य चालू आहे पण आपल्याला कळत नाही म्हणून दुस-या कुणाला तरी हा का शहाणा? असा प्रश्न न करता पुर्वी हात जोडायचो अता आंगठा दाखवतो. मग ते न्यूटनच सफरचंद असो नाहीतर आर्यभट्टाचे लिलावती असो उगा आपला चिखलाचा गोळा फेकत बसत नाही. मोठेपणाला वाकून नमन. ( येथे एक कबुली देऊन टाकतो. लिलावती एक नर्म शृंगारिक कादंबरी म्हणून विकत घेतली होती पण माझ्या गणिती प्रतिभेच्या क्षमतेप्रमाणे विचार करुन उपमा देतो की अति अवघड सुडोकू घरी घेऊन आलो.)
तर अशा कोट्यावधी सामान्य माणसांना परवा पण एक पराक्रम झाल्यावर आनंद झाला म्हणा किंवा नक्की काय महान झाले हे कळले नाही म्हणा, त्यापैकी अस्मादिक एक आम्ही.
कोणीतरी दंडपाणि पारायण केले.( आम्हाला फक्त खेळ माहिती) २००० श्लोक, ते वेद, ते उलटसुलट क्रमानी म्हणायचे, बिनचूक म्हणायचे ( त्यात परत १००/१०० हवेत, ३५ पासिंग नाही, वर्ग वाचावा म्हणून २७ चे ३५ नाही चालणार), आम्ही आपली बोट तोंडात घातली कौतुक केले. काहींना आमचा बोटचेपेपणा नाही आवडला. ते ज्ञानी, त्यांना पाठांतराच काय आल कौतुक. आम्हाला वेदांचा उपयोग म्हणजे खरंतर फायदा माहिती नाही. त्या विवेकानंदांना म्हणे कोणतही शास्त्रीय संशोधन वेदातील ऋचां मधील मधुर किणकिण वाटायची. आपल्याला नाही वाटली बुवा कधी.
तर अशा १९ वर्षीय वेदव्रत रेखे याच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह उभे करणा-या अति विद्वानांनाही ( जरी पराक्रम व नाव माहिती नसले तरी) नमस्कार करून टाकतो.
पण वेदव्रतांच्या महान विद्वत्तापूर्ण पराक्रमाला मात्र लाख लाख दंडवत.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment