योगी अरविंद राष्ट्र चिंतन
योगी अरविंद हे धर्म, तत्वज्ञान व महाकवी म्हणून प्रसिद्ध आहेतच. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान योध्दे होते. त्यांची जेवढी शिस्त धर्म व तत्वज्ञान यावरील मांडणीत होती तेवढीच शिस्त व जोडीला सौंदर्य दृष्टी त्यांच्या आश्रम व त्यातील प्रत्येक आयामात होती. व त्यामुळे जगभर हिंदू धर्म व तत्वज्ञान या विषयी आकर्षण, आसक्ती व आत्मसात करण्याची इच्छा निर्माण झाली हे खरे आहे.
पण त्यांच्या आध्यात्मिक बैठकीचा आधार समंजस सांस्कृतिक राष्ट्र विचार होता. सर्व जगाला हिंदू धर्म चिंतनातील व हिंदू तत्वज्ञानातील सर्वसमावेशकता समजून सांगताना, हे धर्म चिंतन व तत्वज्ञान सिध्द केलेल्या या सांस्कृतिक राष्ट्र म्हणजे भारत याचे कधीच विस्मरण होऊ दिले नाही व म्हणूनच स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला फाळणी झाल्यावरही या महापुरुषाने ही तात्कालिक असून ही कृत्रिम रचना लवकरच नाहिशी होईल अशी भविष्यवाणी केली. कारण हिंदू धर्म व तत्वज्ञान याच्यात अंगभूत वैश्विक सहजीवनाच्या मुलाधारावरील हा फाळणीरुपी कुटीराघात हा धर्म व हे तत्वज्ञान सहन करणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती.
याचे कारण ही स्पष्ट होते. त्यांच्या राष्ट्रविषयी अवधारणा या बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्य संस्कारातून घडल्या होत्या व विवेकानंदांच्या सहज बुध्दिचा प्रभाव व चैतन्यमय हिंदू राष्ट्राच्या मिशन विषयी एकात्मतेतून घडलेल्या होत्या.
पण एक विलक्षण साम्य तत्कालिन या सर्व समाजधुरीणींमध्ये दिसते ते म्हणजे स्वातंत्र्याची पूर्व अट आहे भारताची, हिंदू धर्म व तत्वज्ञानाची राष्ट्र विषयी संक्लपनेची स्पष्टता निर्माण करणे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम् आधारे राष्ट्राचे बलस्थान अध्याम हेच आहे हे सांगितले व स्वतः ही उत्तर आयुष्यात गीता, हिंदू तत्वज्ञान व भक्ती मार्गावर गेले. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये भारताची वैश्विक चिंतनाची परिपक्वता सांगून स्वतंत्र भारताची आवश्यकता स्पष्ट केली. योगी अरविंद यांनी प्रत्यक्ष क्रांतीकार्यात भाग घेऊन नंतर राष्ट्र संक्लपने विषयी स्पष्टीकरणासाठी आध्यात्म व योगाचा मार्ग निवडला. शेवट पर्यंत स्वातंत्र्य लढ्यात राहिलेल्या लोकमान्य टिळकांनीही राष्ट्र संक्लपना स्पष्ट करणा-या दैशिक शास्त्र या बद्रिसहाय टुलधरिया यांच्या पुस्तकास प्रस्तावना देण्याचे ठरविले होते.
भारताची राष्ट्र संक्लपना पूर्णपणे आध्यात्मिक, सर्व जगाचे कल्याण चिंतणारी व म्हणून सर्वेषां अविरोधेन आहे व म्हणूनच सर्व जगाला मार्गदर्शक आहे, हे संचित जगाला समजावण्यासाठी या सर्व महापुरुषांनी साधा सरळ आंदोलन मार्ग वेळ प्रसंगी सोडून पण हिंदू धर्म, तत्वज्ञान, राष्ट्र, व हिंदू नरनारी यांच्या कल्पनेतून साकारलेला जगत कल्याणकारी राष्ट्रभाव अभ्यासून मांडला व आज आपण सर्वजण या पाथेयच्या आधारे भारताचे होऊ घातलेले जगद्जननीचे रुप अनुभवत आहोत.
५ डिसेंबर योगी अरविंद निर्वाण दिना निमित्त एक चिंतन.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment