भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 'शंभरी'
हा पक्ष शंभर वर्षांचा झाला. ह्याच्या मूळ विचाराला थोडी अधिक वर्षं होऊन मृतप्राय झाला. हा विचार मृतप्राय झाला यात दु:ख करण्यासारखे काही नाही. कारण तो विचार अशास्त्रीय होताच पण सर्वंकष लागू होईल इतका खोलही नव्हता. त्यामुळे काही तरी गमावले आहे असे मानण्यासारखेही त्यात काही नाही. म्हणून भारतातील कम्युनिस्ट पक्षांचे असे का झाले? याचाही विचार करण्याची आवश्यकता नाही.
पण तरीही या विचारा आडून जगाला शंभर एक वर्ष वेठिला धरले गेले, ते कसे? हा प्रश्न उरतो व त्याचे उत्तर शोधताना त्या विचाराची भलावण करण्याची इच्छा होते. पण त्याचेही उत्तर स्पष्ट पण वेगळे आहे. त्या वेळच्या अनेक देशभक्तांनी आपापला देश पारतंत्र्य किंवा जुलुम मुक्त करण्यासाठी ह्या नवीन शिडीचा वापर केला. कम्युनिझम येण्यापूर्वी सुध्दा लोक क्षोभ असाच व्यक्त होत असे व असेच सत्ता परिवर्तन होत असे.
पण त्या सत्ता परिवर्तनामध्ये ध्येयवाद नावाची फोडणी घातली जात नसे, ते या कम्युनिझममुळे शक्य झाले.
त्यामुळेच रशिया असो, चीन असो, झेकोस्लव्हाकियो असो, स्वतः च्या विकृत क्रौर्याला क्रांतीच्या पदराखाली लपवता येईल म्हणून या कम्युनिझमचा या सर्वांनी स्विकार केला असे दाखवले पण प्रत्यक्षात राचसत्तेची हुकुमशाहीच आणली.
यात या सत्ताधा-यांची काहीच चूक नव्हती कारण त्या मूळ विचारातच हुकूमशाही या दोषाचे शुध्दीकरण करून झाले होते. म्हणून कम्युनिझमचे सोवळे नेसून देशात हुकूमशाही व भांडवलशाही विरुद्ध लढा या नावाखाली देशाचा विस्तारवाद असा दुहेरी खेळ सहजपणे खेळता आला. त्यामुळे भाबडेपणाने कम्युनिझम नावाचा काही विचार होता व त्याने जगावर ५० वर्षे राज्य गाजवले असा विचार करता येणार नाही. आपापल्या देशातील जुलमी राजवटी उलथवून टाकणे हे स्वाभाविक काम व ह्या विचारा आडून जगभर चबढब एवढेच या विषयाला महत्त्व होते.
हा विचार किती कमकुवत होता की ५० वर्षे सुध्दा तो स्वप्नाळू जगाला भुरळ घालू शकला नाही.
सामान्यपणे शताब्दी असलेल्या व्यक्ती किंवा संस्था यांचे स्मरण केले जाते, तद्वत हे पण एका दुर्दैवाचे स्मरण आहे, एवढेच.
पण सध्या या पराभूत व मृत विचाराला तो एखादा मायावी राक्षस असून रंग बदलून नवीन सोंग घेऊन येत आहे अशी आवई उठवली जात आहे. आणि तो अता पहिल्या पेक्षा भयंकर रुपात येत आहे असे अनेकांना मनापासून वाटत आहे. याला सांस्कृतिक मार्क्सवाद ( cultural Marxism) असे नामकरण करुन कोणत्याही आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय धुडगुसास हाच कसा कारणीभूत हे सांगण्याचा अट्टाहास चालू होतो. वोकिझम असो, डीप स्टेट थिअरी असो, झेन झीचा थिल्लरपणा असो, एखाद्या शहरा एवढ्या देशाचे अपहरण असो, त्या घटनेला घाबरून बघा हा नवीन रंगातला व ढंगातील सांस्कृतिक मार्क्सवाद असे त्याचे उदात्तीकरण (glorification) केले जाते. व या विचारवंतांनाही आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असे म्हणायला मोकळीक मिळते. अत्ता कम्युनिझम कुठेही जागतिक पटलावर काहीही भूमिका घेऊ शकत नाही कारण ती गोष्ट अस्तित्वातच नाही.
जगात बळी तो कान पिळी हा दोष आहे, म्हणून संघर्ष, अन्याय दिसतो व दिसणार? पण तो सांस्कृतिक मार्क्सवाद नाही. मार्क्सवादच नाही.
भारतातील कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दी वर्षात, तुम्ही स्वतः नष्ट होऊन, ते स्वतःला मान्य होऊन ही विरोधक जिवंत ठेवण्यासाठी आटापिटा करत आहेत हे खरच तुमचे पुर्व जन्मीचे पुण्य असावे.
पण असे थोडे विचारवंत सोडले तर तुम्ही अस्तित्वहीन झाला आहात म्हणून सामान्य माणूस तुमच्या तत्वज्ञान व अस्तित्वाला श्रध्दांजली वहात आहेत. त्यात माझी पण एक समिधा.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment