राम जन्मला ग सखी राम जन्मला
*राम जन्मला ग सखी राम जन्मला*
आज प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस आहे. सर्व पृथ्वीतलावर नैतिकतेचे, न्यायाचे, स्त्री सन्मानाचे, वैयक्तिक व सामाजिक जीवनातील योग्य वर्तनाचे धडे देण्यासाठी आज रामनवमीला प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला व असे मापदंड घालून दिले की हजारो वर्षांपासून आज तागायत ते जन सामान्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
वैयक्तिक चारित्र्य, कुटुंब व्यवहारातील त्यागाचे महात्म्य, राजकीय नैतिकता, न्याय निष्ठूर जीवन, स्त्री सन्मान फक्त माता सितेसाठी नाही तर वनवासी शबरीसाठी सुध्दा देऊन प्रत्येक स्त्री ही समान सन्मान प्राप्त आहे हे सांगितले, असे प्रत्येक विषयावर इतके खोलवर परिणाम करणारे मापदंड दिले आहेत की १० सहस्त्र वर्षांनंतरही ते तसेच लागू आहेत. इतके की भारतीय कुटुंब कायदा सुध्दा एक पत्नी व्रताचाच पुरस्कार करते.
पण आज आपण दोन जरा वेगळ्या मुद्यांच्या
आधारे राम जन्म साजरा करु या.
बुध कौशिक ऋषिंनी रामरक्षा स्तोत्र आपल्याला दिले आहे. अनुभूतीचे शब्द असल्याने ते साक्षात मंत्र रुपात आपल्याला मिळाले आहेत. म्हणून ते गेयही आहेत व अत्यंत अर्थपूर्णही आहेत. त्याचे वर्णन फक्त स्तोत्र नाही तर मानवाचे सुरक्षा कवचच मानले गेलेले आहे. कोणतीही आई नवजात बालक मांडीवर घेऊन हीच रामरक्षा त्या बालकाला ऐकवते. याच श्रध्देने की ते संरक्षण कवच माझ्या बाळाचे रक्षण करेल व तसेच प्रभू रामचंद्रांचे जीवन त्याचा जीवनादर्श बनेल. संपूर्ण रामरक्षा ही माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची रक्षा करेल असेच वर्णन बुधकौशिक ऋषिंनी केले आहे. प्रत्येक श्लोकात आर्तपणे ही मागणी केली गेली आहे. प्रत्येक नात्याचा उल्लेख आहे. आई वडील, पत्नी, भाऊ सर्वांविषयीचा भाव दिला आहे. हे लहान बाळ ते ऐकत ऐकत व पचवून घेत हिंदू नागरिक बनत असतो.
*म्हणून कोणत्याही घसरलेल्या सामाजिक मूल्यांमधुनही कुटुंब जबाबदारीत तो हिंदू व्यक्ती चुकत नाही. कारण कुटुंब त्यागावर उभे असते हे प्रभू रामचंद्रांनी स्व वर्तनातून सिद्ध केले आहे व बुध कौशिक ऋषिंनी ते प्रत्ययकारी शब्दात रामरक्षेत मांडले आहे.*
जे कोणत्याही जातीतील हिंदू लहानपणी आईकडून ऐकून शिकत आला आहे. रामरक्षेचे रसग्रहण हा स्वतंत्र विषय आहेच. पण मला त्याहूनही महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचे आहे. हे स्तोत्र बुध कौशिक ऋषिंना भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन सांगितले व मग ते ऋषिंनी लिहिले.
**ही गोष्ट आधुनिक काळातील हिंदू शब्दावर आलेल्या ऐतिहासिक जबाबदारीचे स्पष्टीकरण देण्यासाठी फार आवश्यक आहे.*
*
ज्यावेळी एकेश्वरवादी विचारांनी जगाला विनाशाच्या उ़ंबरठ्यावर आणून उभे केले आहे व भांबावलेले जग शांततामय, समंजस सहजीवनाची अपेक्षा व ती सुध्दा हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू नरनारी व भारत देश या कडून करत असताना हर हरी अद्वैत समजून घेणे रामरक्षा म्हणताना आवश्यक झाले आहे.
एकच देव, एकच प्रेषित, एकच पुस्तक असे अब्राहमिक पंथ व त्याच वळचणीतील वैचारिक व अस्तित्व पातळीवरुन नष्ट झालेला कम्युनिस्ट यांनी जगात द्वैत व विद्वेष पसरवला असताना हिंदुंचे हे सह अस्तित्व फक्त स्विकारणे नाही तर त्याचा सन्मान करणे व सह अस्तित्व हे सन्मानपूर्वक जपणे हे सर्व जगाला खुणावत आहे. व हे हजारो वर्षांचे संस्कार पाथेय घेऊन उभा असलेला हिंदू नर नारींचा समाज हा आशेचे किरण आहे.
देव एकच नाही तर परस्पर सहकारी व परस्पर आदरही ठेवतात व सर्व तरीही ते सर्व शक्तिमान नाहीत. म्हणून तर दृष्टावा माहिती असूनही रावणाच्या भक्तीच्या शक्तिपुढे शंकर भगवान ही हतबुद्ध होते व विष्णूंना अवतार घ्यावा लागला. त्या भगवान शंकरांनी रामरक्षा ही स्तुती बुध कौशिक ऋषिंना सांगीतली. व प्रत्यक्ष रामावतारात शंकरभक्ति विष्णू करतात व रामेश्वरम् येथे शिवलिंगाची स्थापना करतात.
म्हणून तर जग आशेने बघत आहे की सर्वांप्रति आदर ठेवून, न्याय्य भावाने विविधततेचा सन्मान करणारा हा धर्म हे तत्वज्ञान, हा समाज हा देश आम्हाला मार्गदर्शन करो.
रामरक्षेतील संरक्षण कवच तर समजून घेऊच पण सर्व देवांमधील तादात्म्यही समजून घेऊ या. कारण हीच आमची विशेषता व शक्ती आहे.
आज सौभाग्यवश समर्थ रामदासस्वामींची जन्मतिथ अष्टमी व रामनवमी एकत्र आहे. तसे रामात एकरुप झालेले व्यक्तिमत्व असल्याने हा दोघांचाही जन्म दिन एक असणे हा नियती संकेतच आहे. संपूर्ण संसार रामनामाशीच केला. करुणाष्टके लिहिली, मनाचे श्लोक किंवा रामाचे दास संबोधुन केलेला दासबोध आपल्याला रामभक्ति व रामशक्ती शिवाय काय सांगतो. रामरक्षेप्रमाणेच काव्य म्हणून याचे रसग्रहण सुंदर होईलच कारण येथील ही प्रत्येक शब्द मंत्राची शक्ती घेऊनच उभा आहे. अंतःकरण पिळवटून टाकणारा आक्रोश अनुदिन अनुतापे तापलो रामराया या एका वाक्यातून बोधित होतो.
ह्या रामदास स्वामींना मारुतीचा अवतार मानले जाते. म्हणजे परत हर हरी आलेच. जिथे प्रत्यक्ष परमेश्वर हाच सहजीवन जगून दाखवत आहे, त्या हिंदू धर्म, तत्वज्ञान, नर नारी, संस्कृती, व भारत देशाला जग ज्या मार्गदर्शनाची अपेक्षा करीत आहे ते कितीसे अवघड आहे.
आज रामनवमी निमित्ताने रामरक्षेतून आपले जीवन कार्यही समजून घेऊ यात.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment