वल्लभाचार्य जयंती आणि हिंदू सहजीवन संक्लपना
🔹वल्लभाचार्य जयंती 🔹
चैत्र कृष्ण ११ म्हणजे आज १३ एप्रिल रोजी स्वामी वल्लभाचार्य यांची जयंती आहे. हिंदू धर्मातील शुध्दाद्वैत सिद्धान्त हा स्वामी वल्लभाचार्य यांनी मांडला. विशेष म्हणजे याच दिवशी वरुथिनी एकादशी आहे, जी भगवान विष्णू यांच्या वराह अवताराच्या निमित्ताने पुण्यप्रद मानली जाते व श्रद्धाळूंसाठी सश्रद्ध भावाने साजरी करुन पुण्यप्राप्ती व वैभव प्राप्तीसाठी योग्य मानली जाते.
स्वामी वल्लभाचार्य हे वैष्णव संप्रदायी आहेत व त्यांनी शुध्दाद्वैत सिध्दांत मांडला आहे. हे प्रत्यक्ष एका हिंदू दर्शनाचे अधिक स्पष्टीकरण असल्याने फक्त शब्द प्रामाण्य न रहाता अनुभूती स्तरावर अनुभवणे पण आवश्यक रहाते. अर्थात अभ्यासक व साधक हे त्याचा अधिक योग्य अन्वयार्थ लावतीलच.
पण थोडक्यात शुध्दाद्वैत म्हणजे आदी शंकराचार्यांनी सांगितलेल्या अद्वैत या प्रमुख हिंदू दर्शनाचे एक कालोचित स्पष्टीकरण आहे. मूळ सिध्दांतात जगद् मिथ्या म्हणजे द्वैत भासमान आहे, म्हणून ब्रह्म सत्य आहे तर जग मिथ्या. तर थोडा फरक होऊन स्वामी वल्लभाचार्य यांनी अद्वैत तर आहेच पण जग मिथ्या नसून ते भक्तिरुप आहे. म्हणून हे विशिष्ट आद्वैत आहे.
पण या बारक्यावामध्ये न शिरता हिंदू जीवनदृष्टी समजून घेणे अधिक योग्य होईल. येथून एक महत्त्वाचा पैलू समजून घेतला पाहिजे. सर्व जग आज युद्धजन्य मानसिकतेत आहे. एकारलेल्या विचारधारांमुळे जग मूळा पासून हादरले आहे व सहजीवनासाठी योग्य जीवन दृष्टी शोधत आहे.
अशावेळी आजचा दिवस महत्वाचा ठरतो. अद्वैत सिध्दांत सांगितला आहे जगद्गुरु शंकराचार्य यांनी, जे शैव होते. शंकर उपासक. पण दर्शन मात्र पूर्ण जगासाठी सांगितले. व त्यावर विशिष्ट अद्वैत सांगणारे स्वामी वल्लभाचार्य मात्र वैष्णव. विष्णू पूजक. पण म्हणून दर्शनात फरक म्हणून आम्ही वेगळे नाही. म्हणून तुझ्या दर्शनाला विरोध करण्यासाठी तलवार काढली जात नाही. तुझ्याही दर्शनाचा मी फक्त स्विकार नाही तर आदर करतो. हेच हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कार, संस्कृती, हिंदू नर नारी वर्तन व भारत देशाने हजारो वर्षांपासून व्यवहारात आणले आहे.
विचार करता येईल की आदी शंकराचार्यांनी अद्वैत सिध्दांत सांगितला इस ८ व्या शतकात व स्वामी वल्लभाचार्य यांनी विशिष्ट अद्वैत सांगितले १५ व्या शतकात. तब्बल सातशे वर्षांनंतर. एकाच भूमित, सातशे वर्षे सातत्यपूर्ण सहजीवन चालू आहे व विविध विचार वैविध्य सन्मानपूर्वक रहात आहेत. एकमेकांची मते ऐकत आहेत, स्विकारत आहेत, नाकारत आहेत, सन्मान करत आहेत हे आज आपण समजून घेतले पाहिजे कारण जगाला हे सर्व समजून सांगायचे आहे. कारण जग शांततामय सहजीवनाचे सूत्र शोधत आहे जे या हिंदू तत्वज्ञानात आहे. आम्ही पुराणकाळ , इतिहासापासून पासून हे सिद्ध केले आहे ते तत्वज्ञान अता परत जगाला द्यावयाचे आहे.
म्हणून या प्रत्येक दिवशी हे हिंदू चिंतन जगासमोर आणावे लागेल.
वल्लभाचार्य जयंतीनिमित्त हा ही विचार होऊ शकतो.
सुनील देशपांडे
Comments
Post a Comment