छत्रपति संभाजी महाराज यांची जयंती
या वर्षी २६ जूनला छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीने जन्म दिवस साजरा होत आहे. खरं तरं छत्रपति संभाजी महाराज यांनी स्वतःचा मृत्यू एवढा महान करुन ठेवला आहे, मृत्युंजय करून ठेवला आहे की तो मृत्यू, ते धिरोदात्त मरण हि एक ललित कृति बनून राहिली आहे. संभाजी महाराज हा शब्द उच्चारताच फक्त बलिदानच आठवते, एवढे ते बलिदान हे महान आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या पराक्रमाने इतिहास जेवढा आश्चर्य चकित झाला नसेल एवढा त्या मृत्यूने इतिहास हा पुलकित झाला आहे. त्या मृत्यूचा पराक्रम समजण्यासाठी अपरिहार्य म्हणून फक्त जन्म आहे. पण तरीही त्या दिवसाचे स्मरण आवश्यक आहे कारण त्या दैदिप्यमान मृत्यूला संभाजी महाराज का कवटाळू शकले याचे उत्तर त्यांचा जन्म ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्यात दडले आहे.
त्या अनोख्या मृत्यु आलिंगनामुळे त्या जन्मकळा जरी झाकोळल्या गेल्या असल्या तरी तेथूनच हा दैदिप्यमान मृत्यू स्विकारण्याची कणखर मानसिकता बनत होती. जन्म झाला त्यावेळी राजपुत्राच्या जन्माचा सोहळा, उत्सव साजरा होत नव्हता तर त्यावेळी संपूर्ण स्वराज्य हतबल होते, जणू मृत्यूचा तातच गळ्याला लागला होता. आनंद उत्साहाने साजरा करणे शक्यच नव्हते, उलट कर्तव्याने कठोरपणे वडिलांना नवजात बालकापासून दूर ठेवले होते. आईला बाळाच्या जन्माचा आनंद होता की नव-याच्या जिवाची काळजी? संभाजी महाराज या नवजात अर्भकाला वास्तवाने जन्मताच शिकवले की काळ किती कठोर असतो. आई दुध देऊ शकत नव्हती. थोडे किलकिले डोळे करे पर्यंत आई गेली व वडिल तर दूर मृत्यूचा सारिपाट खेळत होते. म्हणूनच म्हणता येते की संभाजी राजांना जन्मानेच त्यांच्यां भयावह मृत्यूला कठोरपणे सामोरे जाण्याचे धाडस शिकवले.
जन्मानंतरही काळाने संभाजी राजांना इतक्या कठोर प्रसंगाना सामोर जायला लावले की तो संभाजी महाराज नावाचा देह फक्त मृत्यूसाठी तयार केला जात होता. असा मृत्यू की जो स्वतःच संभाजी महाराज नावाने अमर झाला. धर्मासाठी, देशासाठी देह किती यातना सोसू शकतो याचे अंतिम उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. राजा शिवाय राज्य चालवण्याची प्रेरणा शिलेदारांना देणारा महान मृत्यू म्हणजे संभाजी महाराज. फक्त नवव्या वर्षी जगातील सर्वात क्रूर धार्मिक विकृताच्या अटकेतील आयुष्य, तर वर्षभर मथुरेतील एका सामान्य ब्राम्हण घरातील सामान्य आयुष्य. जेंव्हा सवंगड्याबरोबर खेळायचे तेंव्हाच राजकारणाच्या सारिपाटावरील पाद्य बनले होते.
एका विशेष मृत्यूच्या तयारीसाठी सर्व आयुष्य घडवले गेले व जन्म सुद्धा. म्हणूनच छत्रपति संभाजी महाराजांची जन्मतिथी विशेष लक्षांत ठेवली पाहिजे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment