हिंदू वैश्विक चिंतनात 'शांतता '

हिंदू चिंतन हे सर्वार्थाने वैश्विक चिंतन का आहे? हे अनेक प्रकाराने तपासता येते. यातील वेद, उपनिषदांतील ब्रम्हज्ञानापासून, तत्वज्ञानापर्यंत प्रत्येक वाक्य हे संपूर्ण चराचर सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवते. ज्ञानमार्गी हिंदू जीवन रचना सुध्दा तत्वज्ञानातील सर्वसमावेशकता सांगते. हिंदू समाजाचे वर्तन व आधुनिक काळातील भारताची संयमित युध्दे, हिंदू संस्कृतीचा विश्व संचार हे सर्व हिंदू चिंतन हे वैश्विक चिंतन आहे हे सहज पटवून देते.
पण हिंदू या शब्दाला शांतता हा गुणवाचक शब्द फारसा जोडला जात नाही. अब्राहामिक पंथ प्रमुख शस्त्रसज्ज दाखवला जात नाही पण एकही हिंदू देव देवता शस्त्राविना नाही. म्हणूनच हिंदू या अंगानेसुध्दा वैश्विक चिंतन कसे आहे? हे बारकाईने समजून घेतले पाहिजे. यासाठी शांतता शब्दाच्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे.
मूळ शांतता शब्द हा संस्कृत मधून जशाच्या तशा आला आहे. व तो मानसिक स्थिती दर्शवितो. तो प्रामुख्याने वेगवेगळे तह, करार, भौतिक शांतता यासाठी वापरला जात नाही. या उलट पीस ( इं) हा शांततेच्या भौतिक प्रयत्नांसाठी वापरला जातो. म्हणून आधुनिक परिभाषेत शांतता शब्द हा भितीदायक शब्द बनला आहे. व दुर्दैवाने तो न्याय्य या शब्दाविरुध्द वापरला जातो. आधुनिक परिभाषेत तर ढोंगीपणाचा पर्याय वाचक शब्द बनला आहे.
आधुनिक काळातील शांततेच्या प्रयत्नातील शोकांतिका नीट अभ्यासल्या तर सहज समजू शकते की हे सर्व प्रयत्न न्यायाशिवायच्या शांतता असेच होते. यासाठी सर्वात मोठे व डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे शांती प्रयत्नातील उदाहरण म्हणजे सन १९४७ सालची भारताची फाळणी. यात दोन पैलु पहायचे आहेत. एक शांतता व दुसरा न्याय्य भूमिका.
प्रथमतः हे पाहू की मुस्लिम तुष्टीकरण, मुस्लिम अनुनय किंवा मुस्लिमां विषयीची भारतीय स्वातंत्र्य लढ्याची भूमिका न्यायसंगत होती का? तर उत्तर नाही असे येते. राष्ट्रगीत म्हणायचे की नाही? स्वामी श्रध्दानंदाच्या वधावर काॅंग्रेस व गांधींची भूमिका, लखनौ करार, खिलाफत चळवळीला पाठिंबा, हे सर्व व असे असंख्य प्रसंग, उदाहरणे सांगता येतील की न्याय्य भूमिका नाकारुन शांतीसाठी प्रयत्न झाले. अता हे पाहू की अन्याय सहन करुनही शांतता प्रक्रियेत किती हिंसा झाली. सरकारी म्हणजे ब्रिटीश व नंतर एतद्देशीय सरकारी आकडेवारी नुसार हा आकडा २ लाख आहे पण कोणाचाही या आकड्यांवर विश्वास नाही व तो सुमारे ५ ते २० लाख मानला जातो. पण शांततेची ही किंमत स्वस्त आहे का? व मग पुढील प्रश्न येतो की एक ठोक किंमत चुकल्यावर शांतता अवतरली का? या नंतर मर्यादित युध्दे झाली. यात सुमारे २५००० सैनिक, हजारो नागरिक, फाळणीची संख्या सोडून सुमारे ३ ते ३१/२ लाख बंगालमधील पूर्व पाकिस्तानी जनता मारली गेली. यात कारगिल पर्यंत ची सरकारी आकडेवारी आहे. म्हणजे अन्याय स्विकारुन शांतता निर्माण झाली नाही हे वास्तव भारताच्या फाळणी निमित्ताने स्विकारावे लागेल. 
दोन महायुध्दे झाली. यातील पहिल्या महायुध्दानंतर league of Nations तयार झाले पण यात जर्मनी व रशिया यांनाच प्रतिबंध होता, त्यामुळे लिग आॅफ नेशन कोणत्याही न्याय्य पायावर उभेच नव्हते व त्यामुळे जगभर शांतता नावापुरतीही राहिली नाही. व्हार्सा करार हा जर्मनीवर अन्याय करणारा होता म्हणून शांतता नांदली नाही. व अन्याय व सामर्थ्य हीन रचनेमुळे अजून एका महायुध्दाला सुपारी मिळाली. अन्यायातून शांतीचा प्रयत्न झाल्यावर या दोन महायुध्दातून जो रक्तपात झाला त्याची संख्या होती अनुक्रमे सुमारे २ कोटी व ८ कोटी. यात दुस-या महायुध्दात नागरिक मृत्यू संख्या ५ कोटींच्या वर होती. अन्य अन्याय संघर्षांवर तर वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही.
म्हणून शांतता हा मूलाधार धरुन वैश्विक चिंतन होऊच शकत नाही. तर वैश्विक चिंतनात तत्वज्ञान पातळीवर सर्व चराचर सृष्टी विषयी समभाव पाहिजे व सर्वांमध्ये एकच आत्मा स्थित आहे हा भाव आवश्यक आहे. हे असल्याशिवाय सहजीवन शक्य नाही व या सहजीवनाचा स्वाभाविक परिणाम म्हणून शांतता नांदणार आहे.
 यातील एकात्म भावना न्याय्य मार्गानेच निर्माण होते. आत्मा हा तत्वज्ञानाचा गाभा असेल तर अन्यायाला स्थान नाही. म्हणूनच सहजीवनाचे व सर्वांमध्ये मीच आहे हे अद्वैत सांगणारी गीता रणभूमीवर सांगितली गेली. कशी ही पूजा केली तरी ती शेवटी माझ्या पर्यंत पोहोचते हे सांगणारे भगवान कृष्ण हे युध्द कर असे सांगतात. अन्याय व शांतता एकत्र नांदू शकत नाहीत. म्हणून कुरुक्षेत्रावर मृत्यूने थैमान घातले पण अन्याय, अधर्म संरक्षित केले नाही. 

म्हणून मराठीमध्ये शांततेला स्मशान शांतता असेही विशेषण आहे. म्हणून शांतता हे ध्येय होऊ शकत नाही. तर न्याय हे ध्येय असते. म्हणून शांतता हा शब्द पीस या इंग्रजी शब्दाशी समकक्ष समजला गेल्याने शांतता म्हणजे संस्कृतमध्ये शम् म्हणजे शमन हा अर्थ न राहता करार अशा अर्थाने वापरला गेला. व म्हणून शांततेचे न्यायाशी नाते तुटले.
शस्त्र हे न्यायाचे प्रतिक आहे, दमनाचे नाही, या चिंतनातून हिंदू देव देवता शस्त्र सज्ज आहेत.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन